तळेगावच्या यात्रेत बळीराजाच्या खेळाला तिलांजली
By admin | Published: January 18, 2016 12:04 AM2016-01-18T00:04:16+5:302016-01-18T00:04:16+5:30
वर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे बैलांना सांभाळत त्यांना चांगले खाऊ पिऊ घालून काहीही काम न करता बसवून ठेवले जाणे ....
विदर्भातील १० हजार बैल बांधलेलेच : २० कोटी रूपयांच्या अर्थव्यवस्थेला तडा
मोहन राऊत/वसंत कुलकर्णी धामणगाव रेल्वे
वर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे बैलांना सांभाळत त्यांना चांगले खाऊ पिऊ घालून काहीही काम न करता बसवून ठेवले जाणे व केवळ एका यात्रेत त्याला बाहेर काढून कोणताही छळ न करता पळविणे हा शासनाच्या आदेशाप्रमाणे आता गुन्हा ठरू लागल्याने तळेगाव दशासरच्या यात्रेतील शंकरपट हा बळीराजाच्या उपेक्षित खेळाला तिरांजली मिळाली आहे़ विदर्भातील तब्बल शंकरपटात पळणाऱ्या दोन हजार बैलजोड्या घरात वर्षांपासून बांधून आहेत.
तळेगावचा शंकरपट येथील नागरिकांच्या जिद्द व परिश्रमामुळे मागील दोन वर्षांपर्यंत टिकू न होता़ दादाजी देशमुख, भाऊजी गोसावी, गणपतराव बगाडे, बापुजी बारी, रामकृष्ण लोहार, आबासाहेब पांडे, तुकाराम शेंद्रे, मसुदा डेहनकर, पंजाबराव गुल्हाने, भुरूभाई अब्दुल्ला खान यांनी या पटाची मुहूर्तमेढ रोवली होती़ कै़नानासाहेब देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवसांची स्पर्धा केली. शंकरपटात तिसऱ्या दिवशी महिला जुळाव्यात म्हणून महिलांचा पट सुरू केला़ यात विदर्भच नव्हे तर मध्यप्रदेश, मराठवाडा, खानदेश, येथून जोड्या सहभागी होत असे.
तत्कालीन जिल्हाधिकारी ले़अॅलर्ट यांच्या अध्यक्षतेखाली १९४२ मध्ये शंकरपटाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला़ १९५४ मध्ये कृषक सुधार मंडळाचे स्थापना करून शंकर पटाची सूत्रे या मंडळाकडे आली़ या शंकरपटात त्याकाळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक श्रध्देय जवाहरलाल दर्डा, खा़ रामदास तडस यांच्यासह अनेक राजकारणी सहभागी होत असे़
तळेगावच्या या पटाला दीडशे वर्षांची परंपरा कायम असताना दोन वर्षापासून या पटाकडे आता शर्यतीतील बैल जोड्या फिरकत नाही़ यंदा अच्छेदिन शेतकऱ्यांना येण्याची चिन्हे असताना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा बंदी घातली आहे़
वर्षभर बैलांना पोटच्या मुलाप्रमाणे बैलमालक सांभाळतात़ लाखो रूपये या बैलजोडीवर खर्च करतात़ तळेगाव येथील यात्रेत भेटून खुशाली विचारणे, शेतीविषयक चर्चा करणे तसेच या यात्रेतून रोजगार मिळणे व कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणे हे केवळ शंकरपटातून घडते़ परंतु या शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक बाबीला तिलांजली मिळाली आहे़