सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्ती ४ फुटांचीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:17 AM2021-09-04T04:17:16+5:302021-09-04T04:17:16+5:30
पोलीस आयुक्त : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक, गणेश मंडळात सीसीटीव्ही अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ...
पोलीस आयुक्त : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक, गणेश मंडळात सीसीटीव्ही
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मंडळ पदाधिकारी, पोलीस मित्र तसेच शांतता कमिटी सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी संबोधित केले. बैठकीला महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह महावितरण, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक, धर्मदाय आयुक्त, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अधीक्षक अग्निशमन विभाग यांच्यासह पोलीस उपायुक्तद्वय उपस्थित होते. यात सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्ती ४ फुटांची, तर घरगुती गणपती १ फुटांचा असावा, असे निर्देश देण्यात आले.
यावेळी गणेश उत्सव पोलीस मार्गदर्शिका व नागरिकांना आवाहन या पोष्टरचे विमोचन करण्यात आले. सार्वजनिक मंडळांना उद्भवाणारी समस्या जसे अखंडित विद्युत पुरवठा, रस्त्यावरील खड्डे याबाबत चर्चा झाली. ती निराकरण्याची ग्वाही उपस्थित विभाग प्रमुखांनी दिली. परवानगीसाठी विविध विभागाच्या नाहरकती लागतात. त्यामुळे विलंब होतो. यासाठी एक खिडकी योजना राबविण्याबाबत मनपा प्रशासनाने विचाराधीन असल्याचे सांगितले.
///////////
अशा आहेत सूचना
गणेशोत्सव, गाैरी पूजन उत्सव काळात कोविड-१९ चे अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशनानुसार तसेच ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन न होता साजरे करावे. घरगुती १ फूट व सार्वजनिक मंडळांनी ४ फूट गणेशमूर्तीची स्थापना करावा, अवैधरीत्या वीज पुरवठा घेऊ नये, सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावे, मंडप परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी. मंडळ व मूर्ती यांचे संरक्षणकरीता स्वयंसेवक नेमावे इत्यादी सूचना देण्यात आल्यात. याच कार्यक्रमादरम्यान राजापेठ ठाणेदार मनीष ठाकरे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना आगीच्या घटनेवेळी कमालीची सजगता दाखवून लोकांचे प्राण वाचविल्याबाबत सन्मानित करण्यात आले.