तोतया पोलिसांची टोळी खऱ्या पोलिसांच्या हाती, ४.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:35 PM2023-08-29T12:35:28+5:302023-08-29T12:37:53+5:30
दरोड्याचा गुन्हा : सहा जणांना अटक
धारणी/अमरावती : क्राईम ब्रॅंचचे अधिकारी कर्मचारी असल्याची बतावणी करून दोघांना लुटणाऱ्या सहा तोतयांना खऱ्या पोलिसांनी पकडून जेरबंद केले. धारणी पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी रात्री ही कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अटक आरोपींमध्ये पंकजसिंग लालसिंग पुनिया (३५), योगेश शेषराव मोहिते (४०), तसावर खान मुस्तफा खान (४८), इमरान अली इमाम अली (३९), मुजिबुल हक वल्द अब्दुल हक (३३) व जाकीर अली वल्द जमील शहा (३१, सर्व रा.रिद्धपूर, ता.मोर्शी) यांचा समावेश आहे.
२७ ऑगस्ट रोजी धारणी तालुक्यातील कुसुमकोट शेतशिवारात रामप्रसाद गुप्ता यांच्या शेतात शेतमजुरीचे काम करणारा दुर्गेश गेंदालाल दारसिंबे (२५, रा.कसाईखेडा) हा त्याचा साळभाऊ लक्ष्मण वंजारी यांच्यासह शेतीचे काम आटोपून किराणा खरेदी करण्यासाठी धारणीकडे पायी येत होते. मधवा नाल्याजवळ दुर्गेशचा एका अज्ञाताने हात पकडला. तथा धारणीमध्ये दारू कुठे मिळते का? आम्ही क्राइम ब्रँचचे पोलिस आहोत, धारणीत दारू व गुटख्यावर रेड करण्यासाठी आलो आहे, अशी बतावणी केली. त्यावर वंजारी यांनी हात सोडण्याबाबत म्हटले असता, त्यांनी दोघांना मारहाण करून, त्यांच्याजवळून एक मोबाइल व १,५०० रुपये जबरीने हिसकावून घेतले. आरोपींनी त्यांच्या चारचाकी वाहनातून पोबारा केला. तेवढ्यात धारणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ धाव घेत आरोपींना जेरबंद केले.
दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ठाणेदार अशोक जाधव यांना आरोपींना पकडण्याची सूचना केली. त्यानुसार, विकास राठोड व इश्वर सोळंके या उपनिरीक्षक यांनी सहाही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी, मोबाइल, रोख असा एकूण ४.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
वैद्यकीय तपासणीच्या दरम्यान आरोपीने केले नाटक
तोतया पोलिस अधिकारी योगेश मोहिते याला वैद्यकीय तपासणी करण्याकरिता धारणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याने रक्तदाब कमी झाला व आपल्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचे नाटक केले. पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी त्याच्यासह त्याच्या अन्य साथीदारांना तंबी दिल्यानंतर तपासणी सुरळीत झाली.
अटक आरोपींपैकी तिघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर शिरखेड ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, तर पंकज पुनियाचा तडीपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
- अशोक जाधव, ठाणेदार, धारणी.