मोबाईल टाॅवरमधील बॅटरी चोरी करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:17 AM2021-08-25T04:17:34+5:302021-08-25T04:17:34+5:30
अमरावती: ग्रामीण भागातील मोबाईल टाॅवरमधील बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. वसीम खान रफिक खान ...
अमरावती: ग्रामीण भागातील मोबाईल टाॅवरमधील बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. वसीम खान रफिक खान (३१, रा. राहुलनगर), राजीक शाह रशीद शाह (२८, रा. इक्बाल काॅलनी), शेख इम्रान शेख सादिक (१९, रा. इक्बाल काॅलनी), लुकमान शाह वल्द हबीब शाह (४९, रा. इक्बाल काॅलनी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात मोबाईल टाॅवरमधील बॅटरीचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्याकरिता पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. त्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना बेनोडा हद्दीतील लखारा येथील मोबाईल टाॅवरमधील बॅटरी या राहुलनगर अमरावती येथे राहणारा वसीम खान रफिक खान याने त्याच्या साथीदारासह चोरल्या आहेत, अशी माहिती एलसीबीला मिळाली. त्या माहितीवरून वसीम खान रफिक खान याला ताब्यात घेतले. त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच आपण साथीदार राजीक शाह रशीद शाह (२८), शेख इम्रान शेख सादिक (१९, रा. इक्बाल काॅलनी) असे मिळून बेनोडा हद्दीतील लखारा शेतशिवार येथून एका मोबाईल टाॅवरमधील २४ बॅटरी चोरल्या होत्या, अशी कबुली दिली. त्यावरून राजीक शाह रशीद शाह व शेख इम्रान शेख सादिक यांना ताब्यात घेण्यात आले. चोरीच्या बॅटरी विकत घेणाऱ्या लुकमान शाह वल्द हबीब शाहलादेखील अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन, दोन दुचाकी, दोन मोबाईल, ४० हजार रुपये रोख असा एकूण ४,२२,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी परतवाडा, बेनोडा, खल्लार व तळेगाव दशासर हद्दीतील गुन्ह्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सूरज सुसतकर, हेडकॉन्स्टेबल दीपक उईके, नायब पोलीस कॉन्स्टेबल दीपक सोनाळेकर, युवराज मानमोठे, अमित वानखडे, नीलेश डांगोरे, सागर धापड, मंगेश नेहारे, चालक कमलेश पाचपोर यांनी केली.