तळेगावात पकडली जनावरे चोरट्यांची टोळी
By admin | Published: March 4, 2016 12:13 AM2016-03-04T00:13:24+5:302016-03-04T00:13:24+5:30
गावागावातून जनावरे चोेरून कत्तलखान्यात विकणाऱ्या टोळीला अखेर तळेगाव पोलिसांनी बुधवारी सायंकाळी नजीकच्या टिटवा गावाच्या शेतशिवारात ....
दोघांना अटक : यवतमाळच्या कत्तलखान्यात विकली गुरे
तळेगाव दशासर : गावागावातून जनावरे चोेरून कत्तलखान्यात विकणाऱ्या टोळीला अखेर तळेगाव पोलिसांनी बुधवारी सायंकाळी नजीकच्या टिटवा गावाच्या शेतशिवारात व्हॅनमधून गोऱ्हा चोरून नेत असताना अटक केली.
विस्तृत माहितनुसार २ मार्च रोेजी दुपारी ४ ते ४.३० वाजताच्या दरम्यान व्हॅन क्र. एम.एच.०४ ए.एक्स.०३८० चा वापर करून गोऱ्हा चोरून यवतमाळ येथील कत्तलखान्यात नेताना पोलिसांना चोरटे आढळून आलेत. पोलिसांनी शिताफीने या चोरट्यांना ताब्यात घेतले. सहाय पोलीस निरीक्षक एस.एस. नितनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीत चौघांचा समावेश आहे. त्यापैकी पोलिसांनी बाबाराव पुंडलिक धवने, बबलू आनंदा मेश्राम(दोघेही रा. यवतमाळ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ५, ९, ११ , अधिनियम १९५५, सहकलम ११-१ ड (प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम) नुसार गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणातील दोन आरोपी फरार आहेत.
यापूर्वी एरड, मालखेड, घुईखेड, दहेगाव, धानोरा ्हाली, बोदडी इत्यादी ठिकाणांहून जनावरे चोरली. ती यवतमाळात नेऊन कत्तलखान्यात त्यांची विक्री केल्याचे चौकशी दरम्यान आरोपींनी कबुल केले.
या टोळीत आणखीही काही आरोपी असल्याचा पोलिसांना संंशय असून चौकशी दरम्यान अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी आरोपींना १६ मार्च दरम्यान पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी चांदूररेल्वेच्या न्याय दंडाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तसेच जनावरांच्या चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त केले आहे. चोरलेला गोऱ्हा तळेगाव येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नितनवरे करीत आहेत. (वार्ताहर)
पशू चोरींमुळे ग्रामस्थ होते हैराण
मागील काही दिवसांपासून या भागात पशू चोरीच्या घटना वाढल्याने ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात हैराण झाले होते. ही टोळी जेरबंद झाल्याने आता गावकऱ्यांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.