'सरकार गँग'च्या १३ सदस्यांची सीपींसमोर पेशी
By admin | Published: March 22, 2017 12:06 AM2017-03-22T00:06:55+5:302017-03-22T00:06:55+5:30
याद राखा पुन्हा दादागिरी केली तर, अशा शब्दांत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांंनी 'सरकार गँग'च्या १३ सदस्यांना ताकिद दिली.
पालकांचीही हजेरी : तर याद राखा, सीपींनी दिली ताकीद
अमरावती : 'याद राखा पुन्हा दादागिरी केली तर, अशा शब्दांत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांंनी 'सरकार गँग'च्या १३ सदस्यांना ताकिद दिली. रविनगरात दहशत पसरविणाऱ्या या गँगच्या सदस्यांची मंगळवारी पोलीस आयुक्तांसमोर पेशी करण्यात आली असून गँगमध्ये बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यातरूणांसोबत यांच्या पालकांनाही आयुक्तालयात बोलविण्यात आले होते.
रंगपंचमीच्या दिवशी रविनगरात रंग खेळणाऱ्या महिला-पुरूष व लहान मुलांमध्ये शिरून सरकार गँगच्या सदस्यांनी धुमाकूळ घातला होता. हा प्रकार लक्षात येताच येथील रहिवासी व आयजी कार्यालयात स्टेनो रायटर पदावर कार्यरत पोलीस कर्मचारी राजेश घुले यांनी सरकार गँगच्या सदस्यांना हटकले. मात्र, गँगमधील सदस्यांनी वाद करीत राजेश घुलेंवरच तलवारीने वार केला. तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी ऋषी रविंद्र उंबरकर (२१,रा.अंबाविहार), बाबू ऊर्फ आदित्य संजय नडे (२१, छांगाणीनगर) व महेश राजेश पळसकर (२०,रा. रविनगर) यातिघांना अटक केली तर दोन आरोपी अद्यापही पसारच आहेत.
पालकांचीही कानउघाडणी
अमरावती : याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सरकार गँगमधील सर्वच सदस्यांना ताब्यात घेण्याचे आदेश राजापेठ पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी सरकार गँगच्या सदस्यांची शोध मोहीम राबवून मंगळवारी १३ सदस्यांना ताब्यात घेतले व त्यांची पोलीस आयुक्तांसमोर पेशी केली. यावेळी पोेलीस आयुक्तांनी गँगमधील १३ सदस्यांना तंबी दिली असून त्यांच्या पालकांचीही कानउघाडणी केली. याद राखा जर पुढे असे प्रकार घडले तर सोडणार नाही, कठोर कारवाई करण्यात येईल, अशा शब्दांत आयुक्तांनी त्या तरूणांना समज दिली.
गँगचे सदस्य महाविद्यालयीन विद्यार्थी
सरकार गँगमधील उर्वरीत १३ सदस्य महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. हे तरूण साईनगर, रविनगर, पटवीपुरा, अंबागेट, चपराशीपुरा आदी भागातील रहिवासी असून ते विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र, हे सर्व विद्यार्थी सरकार गँगशी संबंधित असल्याचे पोलीस चौकशी दरम्यान उघड झाले आहे.