सात वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार, मामेभावासह एकाचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 05:54 PM2018-03-11T17:54:40+5:302018-03-11T17:54:40+5:30

सात वर्षीय मामेबहिणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघडकीस आला

The gangrape of seven-year-old girl, gangrape act | सात वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार, मामेभावासह एकाचे कृत्य

सात वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार, मामेभावासह एकाचे कृत्य

Next

अमरावती :  सात वर्षीय मामेबहिणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री अमरावतीत उघडकीस आला. या घटनेतील दोन्ही नराधमांना नागरिकांनी चोप दिल्यामुळे भीमनगर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ दखल घेत संदीप गंगाराम वानखडे (रा. भीमनगर) याला अटक केली. नागरिकांच्या मारहाणीतून वाचत आरोपी अजय संजय भटकर हा पसार झाला आहे. 

भीमनगरातील झोपडपट्टीत राहणारा संदीप वानखडे हा पीडित मुलीचा मामेभाऊ आहे. पीडिताची आई मनोरुग्ण असून, तिचा विवाह उत्तर प्रदेशातील एका तरुणाशी लावण्यात आला. दोन मुले व एक मुलगी झाल्यानंतर ती अमरावतीत परतली. ती मनोरुग्ण अवस्थेत शहरात फिरते, तर मुलांचे संगोपन मामा करते. पीडिताचा मामा कटला चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, तर त्याचा मुलगा संजय हा पन्नी वेचण्याचे काम करते.

शनिवारी सात वर्षीय पीडित मुलगी रडत असल्याचे परिसरातील एका महिलेच्या निदर्शनास आले. तिने पीडिताला प्रेमाने जवळ घेऊन विचारपूस केली असता तिने पोटात दुखत असल्याचे सांगितले. संजयसह अन्य एकाने उचलून झोपडी नेले व तेथे आळीपाळीने रात्रभर लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक कथन पीडिताने केले. त्यांनी या चिमुकलीला जिवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले होते. सदर महिलेने पीडित मुलीला घेऊन गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (ड), ३७६ (एफ), ३७६ (२) (आय), ३७६ (२) (जे), ३७६ (२) (के), ३७६ (२) (एन) सह कलम ४, ६, १० पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. 

दोन्ही नराधमांना नागरिकांचा चोप
सात वर्षीय बालिकेच्या लैंगिक शोषणाची वार्ता पसरताच नागरिकांनी दोन्ही आरोपींना पकडून चोप देण्यास सुरुवात केली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक मनीष ठाकरेंसह पोलिसांचा ताफा पोहोचला. पोलिसांनी संदीप वानखडेला अटक केली. पसार अजय भटकरच्या शोधात गाडगेनगर ठाण्याचे पथक रवाना झाले आहे.

अनेकदा लैंगिक अत्याचार 
पीडित मुलगी ही नातलग असल्यामुळे आरोपीच्या घरात तिची ये-जा असायची. घरी कोणी नसले की, आरोपी बालिकेवर लैंगिक अत्याचार करायचे. आरोपींनी बरेचदा पीडिताचे लैंगिक शोषण केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. 

पीडित बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळताच तत्काळ दखल घेत घटनास्थळ गाठले. घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. एका आरोपीला अटक करण्यात आली असून, एकाचा शोध सुरू आहे. 
मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.

Web Title: The gangrape of seven-year-old girl, gangrape act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.