महामार्गावरून थ्रो; गांजाचे बॉल थेट अमरावती कारागृहात, अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 04:45 PM2022-12-10T16:45:08+5:302022-12-10T16:52:03+5:30
पोलिसांना पत्र, अमली पदार्थांसाठी कैद्यांद्वारे आगळीवेगळी शक्कल
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात मागील बाजूस गेलेल्या नवीन हायवेवरून गांजा, चरस, अफीम आदी अमली पदार्थ बॉलद्वारे फेकले जात असून, याबाबत फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे नागपूर-औरंगाबाद नवीन राष्ट्रीय महामार्गाचा रिंग रोड कारागृहासाठी धोकादायक ठरू लागला आहे.
मध्यवर्ती कारागृह हे अमरावती शहराच्या मध्यवस्तीत आले आहे. कारागृहाच्या मागील बाजूस नवीन रिंग रोड, तर अन्य तिन्ही बाजूने लोकवस्तीचा परिसर आहे. परिणामी कारागृहाच्या पाषाण भिंतीपल्याड चौफेर सुरक्षा यंत्रणा हाताळणे मनुष्यबळाअभावी कारागृह प्रशासनाला शक्य होत नाही. यंदा जून महिन्यात झालेल्या ‘जेल ब्रेक’नंतर तीन कैद्यांनी पलायन केले होते. त्यानंतर मध्यवर्ती कारागृहाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था चोखपणे बजावली जात आहे. मात्र, काही नशेखोर कैद्यांनी आता गांजा, चरस, अफीम वा गुटखा असे पदार्थ कारागृहात मागविण्यासाठी नवीन हायवेवरून बॉलचा वापर करीत आहेत. रात्री-अपरात्री महामार्गावरून थ्रो बॉल करून कारागृहात अमली पदार्थ आणण्याची शक्कल लढविली जात असल्याची माहिती आहे. गांजाचे थ्रो बॉल संबंधित कैद्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरक्षा कर्मचारी अथवा पहारेकरी कैदी सहभागी असल्याचे दिसून येते.
कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत उणिवा
येथील मध्यवर्ती कारागृहात गत सहा महिन्यांपूर्वी ‘जेल ब्रेक’ची घटना घडली होती. यात काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईदेखील झाली. मात्र, तरीही कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत पाहिजे तशी सुधारणा झाली नाही, असे चित्र आहे. गत काही दिवसांपासून कारागृहात थ्रो बॉलद्वारे अमली पदार्थ येत असतील तर याला जबाबदार कोण, याचा कारागृह प्रशासनाने शोध लावणे गरजेचे होते. मात्र पाेलिसात तक्रार करून नामानिराळे होण्याचा हा प्रकार ठरत आहे.
कारागृहाची तटभिंत हायवेवरून हाकेच्या अंतरावर
नवीन हायवेवरून कारागृहाच्या आतील भाग सहजतेने बघता येतो, असा हायवे मार्ग उंचावर आहे. नेमकी हीच बाब हेरून नशेखोर कैद्यांच्या समर्थकांनी थ्रो बॉलद्वारे गांजा, चरस, अफीम कारागृहात पोहोचविण्याची शक्कल लढविली आहे. यात ते यशस्वी देखील होत आहे. तटभिंतीवरून काही वस्तू, साहित्य कारागृहात सहजतेने फेकता येईल, असे हायवेचे अंतर आहे. कारागृहात भाईगिरी करणारे काही कैदी गांजाचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे.
विदेशी, नक्षलवादी, खुनाच्या आरोपातील कैदी
येथील मध्यवर्ती कारागृहात हल्ली १५०० पेक्षा जास्त कैदी बंदिस्त आहेत. यात जन्मठेप, सश्रम कारावास, मकोका, एमपीडीए, नक्षलवादी, एनपीपीएस, विदेशी, रात्र पहारेकरी, लालपट्टी, सिद्धदोष अन्वेक्षक कैद्यांचा समावेश आहे. महिला, पुरुष कैदी बंदिस्त आहेत.
कारागृहात तटभिंतीच्या बाहेरून बॉल फेकल्या जात असल्याची तक्रार मी रुजू झाल्यापासून नाही. पण याअगोदर दिली असेल तर याची खात्री करून घेईल. कारागृहाच्या तटभिंतीची उंची, बाह्य सुरक्षासंदर्भात विशेष शाखेकडून ऑडिट केले जाते. आता कारागृह तटभिंतीच्या बाहेरील भाग किंवा नवीन हायवेवर पोलिसांची गस्त वाढविली जाईल.
- गोरखनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे