अंजनगावातून सलग दुसऱ्या दिवशी गांजा जप्त; एलसीबी, अंजनगाव पोलिसांची संयुक्त कारवाई
By प्रदीप भाकरे | Published: February 22, 2024 01:28 PM2024-02-22T13:28:51+5:302024-02-22T13:29:16+5:30
साडे तीन किलो गांजा बाळगताना एकाला अटक, गांजा तस्करी करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० फेब्रुवारी रोजी अंजनगाव सुर्जी येथील स्मशानभूमी परिसरातून अटक केली.
अमरावती: अंजनगाव सुर्जी येथून सलग दुसऱ्या दिवशी ३ किलो ५०९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा व अंजनगाव सुर्जी पोलिसांनी २१ फेब्रुवारी रोजी ही संयुक्त कारवाई केली. गोपाल उत्तमराव फुसे (वय ३७ रा. माळीपुरा अंजनगाव सुर्जी) असे अटक गांजा तस्कराचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २१ फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करीत असता अंजनगाव सुर्जी येथील गोपाल फुसे हा अवैधरित्या विक्रीसाठी गांजा घेवुन येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. प्राप्त माहितीची शहानिशा करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंजनगाव सुर्जी ते आकोट रोडवरील कचरा डेपोसमोर सापळा रचला. सापळयादरम्यान, आरोपीची झडती घेतली असता त्याच्याजवळील बॅगमध्ये ५२ हजार ५०० रुपयांचा गांजा, एक हजार रुपयांची बॅग व मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीविरुध्द अंजनगाव सुर्जी पोलिसांत एनडीपीएस कायदयान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरण वानखडे, अंजनगाव सुर्जी येथील ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरिक्षक संजय शिंदे, अंमलदार त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, सुधिर बावने, सैयद अजमत, निलेश डांगोरे, दिनेश कनोजिया, सागर धापड, रितेश वानखडे, चालक संजय गेठे, जयसिंग चव्हाण, शुभम मार्कंड यांनी केली.
मंगळवारी देखील केली कारवाई
गांजा तस्करी करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० फेब्रुवारी रोजी अंजनगाव सुर्जी येथील स्मशानभूमी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून ३ किलो ८६८ ग्रॅम गांजा व अन्य साहित्य असा एकूण ६६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.संतोष साहेबराव गुंजावाळे (२९, रा. वानखडे पेठ, अंजनगाव सुर्जी) असे अटक तस्कराचे नाव आहे. संतोष गुंजावाळे हा विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा घेऊन अंजनगाव सुर्जीला येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.