गंगाधर स्वामी मठातील नवसाला पावणारा गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:43+5:302021-09-12T04:15:43+5:30

पान २ बॉटम नेरपिंगळाईवासीयांची श्रद्धा : लोटांगणाची जुनी परंपरा नेरपिंगळाई : येथील श्रीगुरूगुरू गंगाधर स्वामी वीरशैव मठातील गणपती नवसाला ...

Ganpati receiving Navsa in Gangadhar Swami Math | गंगाधर स्वामी मठातील नवसाला पावणारा गणपती

गंगाधर स्वामी मठातील नवसाला पावणारा गणपती

Next

पान २ बॉटम नेरपिंगळाईवासीयांची श्रद्धा : लोटांगणाची जुनी परंपरा

नेरपिंगळाई : येथील श्रीगुरूगुरू गंगाधर स्वामी वीरशैव मठातील गणपती नवसाला पावणारा असल्याची श्रद्धा पंचक्रोशीत आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून या मठात गणेशोत्सव साजरा केला आहे. विसर्जन स्थळापासून मठापर्यंत दीड किलोमीटरचे नवसाचे लोटांगण प्रसिद्ध आहे.

मठाच्या स्थापनेची नोंद प्रवेशद्वारावर आजही अंकित आहे. १२ व्या शतकातील कल्याणमधील क्रांतीनंतर सर्व शरण देशाच्या अन्य भागात विखुरले गेले. शरणाई आपले बालबस्व घेऊन येथे राहत असताना बालबस्व अचानक बेपत्ता झाला. शरणाई चिंतित झाल्या. तो परत यावा म्हणून त्यांनी श्रीगणेशाची आराधना केली आणि बालबस्व धावत येऊन शरणाईला बिलगला. तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा. तेव्हापासून या मठात श्रीगणेशाची स्थापना होऊ लागली, असे सांगितले जाते.

ज्या ठिकाणी शरणाईने श्रीगणेशाची स्थापना केली, त्याच जागेवर आजही ही विधिवत माती ठेवण्यात येते. या मातीवर ‘काशीखंड’ या धार्मिक ग्रंथाचे संस्कार केले जातात. त्यानंतर ती अमरावतीच्या मूर्तिकारांकडे पोहचवून मूर्ती घडविण्यात येते. सहा ते सात फूट उंचीची व परंपरागत स्वरूपाची मूर्ती कोरोनाच्या काळात चार फूट उंचीची बनविण्यात आली आहे.

मठातील गणेशोत्सवाला १०५८ वर्षांची परंपरा लाभली आहे. गंगाधर स्वामींच्या वेळी परिसरातून शंभर ते दीडशे दिंड्या गणेशोत्सवात सहभागी होत असत. काळ बदलला, परंतु उत्साह मात्र तोच आहे. तब्बल दहा दिवस चालणारा गणेशोत्सवादरम्यान भाविक व गावकऱ्यांसाठी अन्नदानाचे आयोजन केले जाते. सध्याचे मठाधिपती शिवशंकर शिवाचार्य स्वामी स्वतः पंगतीमध्ये फिरून भाविकांना काय हवे, काय नको, याची आस्थेने चौकशी करतात. दहा दिवस विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात. मठातील आरतीला दररोज गावातील सर्वधर्मीय लोक उपस्थित राहत आहेत.

विसर्जन मिरवणूकही देखणी

मठाव्यतिरिक्त गावात पन्नासच्या वर सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. येथील गणेश विसर्जन सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. अग्रभागी मठाचा गणपती असतो. मिरवणुकीत दिंड्या , ढोल-ताशे, भजनी मंडळ व सार्वजनिक विषयांवरील देखावेदेखील सहभागी होतात. विसर्जनानंतर काही भाविक श्रीगुरू गंगाधर स्वामींच्या नावाने लोटांगण घालतात. भाविकांना मठातील विहिरीच्या पाण्याने आंघोळ घातली जाते. मठाधिपती त्यांना प्रसाद देतात. या लोटांगण दरम्यान कोणतीही इजा होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Web Title: Ganpati receiving Navsa in Gangadhar Swami Math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.