महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:08 AM2017-10-22T01:08:48+5:302017-10-22T01:08:59+5:30
शहरातील अस्वच्छतेला आयुक्त हेमंत पवार व स्थायी समिती सभापती तुषार भारतीय ही दुक्कली जबाबदार असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमानने आयुक्तांच्या दालनाबाहेर कचºयाचा ढीग लावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील अस्वच्छतेला आयुक्त हेमंत पवार व स्थायी समिती सभापती तुषार भारतीय ही दुक्कली जबाबदार असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमानने आयुक्तांच्या दालनाबाहेर कचºयाचा ढीग लावला. महापालिकेला सुटी असताना शनिवारी सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात आले. एका ट्रॅक्टरमधून आणलेला कचरा प्रवेशद्वारासमोर टाकण्यात आला.
स्वच्छतेबाबत प्रशासन आणि स्थायी समिती सहा महिने निर्णय घेऊ न शकल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचा आरोप युवा स्वाभिमानने केला आहे. अस्वच्छतेने होणाºया स्वाइन फ्लू, डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड यासारख्या गंभीर आजाराला जबाबदार कोण, असा सवाल आयुक्तांना करीत पाच दिवसांत प्रशासन व स्थायी समिती सभापतींनी दखल घ्यावी, अन्यथा महापालिकेत कचºयाचा ढीग लावला जाईल, असा इशारा युवा स्वाभिमानचे शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे, अनूप अग्रवाल, अभिजित देशमुख, नीलेश भेंडे, निल निखार आदींनी दिला आहे.
शहर कोतवाली ठाण्यात तक्रार
महापालिका आवारात कचरा टाकल्याप्रकरणी स्वास्थ्य निरीक्षक धनीराम कलोसे यांनी शहर कोतवालीत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या तीन ते चार कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविच्या कलम १८६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.