मुरुमाऐवजी कन्या शाळेत कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 09:58 PM2018-09-17T21:58:39+5:302018-09-17T21:59:10+5:30
नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत दयार्पूर शहरातील वाढलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्या बुजल्या होत्या. अतिक्रमण हटविल्यानंतर या नाल्या या जेसीबीच्या माध्यमातून मोकळा करण्यात आल्या आहेत. मात्र, या नाल्यांतील कचरा शहरातील कन्या शाळेच्या प्रांगणात टाकला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत दयार्पूर शहरातील वाढलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्या बुजल्या होत्या. अतिक्रमण हटविल्यानंतर या नाल्या या जेसीबीच्या माध्यमातून मोकळा करण्यात आल्या आहेत. मात्र, या नाल्यांतील कचरा शहरातील कन्या शाळेच्या प्रांगणात टाकला जात आहे.
नगरपालिकेच्या अखत्यारीतील शहरातील कन्या शाळेच्या आवारात गेल्या कित्येक वर्षांपासून एका हॉटेलमधील सांडपाणी येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. त्यामुळे कन्या शाळेतील संपूर्ण परिसर स्वच्छ करावा, यासाठी नगरपालिकेला विविध संघटनांच्यावतीने निवेदने देण्यात आली. विशेष म्हणजे, या शाळेमध्ये शहरातील चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेतात व सायंकाळच्या वेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, चिमुकले हे या शाळेच्या पटांगणात फेरफटका मारण्यासाठी, खेळण्यासाठी येत असतात. मात्र नगरपालिकेने ज्या ठिकाणी मुरूम टाकावा, त्याठिकाणी शहरातील नाल्यांमध्ये तीन ते चार वर्षांपूर्वी साचलेला कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, सध्या संपूर्ण जिल्हाभरात अस्वच्छतेमुळे रोगराईचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. डासांमुळे उद्भवणारे डेंग्यू, मलेरिया आदी आजारांनीही उसळी घेतली आहे. त्यामुळे नगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावून गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक त्या ठिकाणी मुरुमाची भरती टाकावी, जेणेकरून रोगराई ही पसरणार नाही, अशी मागणी दर्यापूरवासीयांनी केली आहे.
कचरा कन्या शाळेच्या आवारात टाकण्यासाठी आरोग्य विभागामार्फत पत्र दिले नाही वा ठराव मंजूर झालेला नाही. मुख्याधिकारी मनमानी करीत आहेत.
- अनिल बागळे, नगरसेवक
राहत्या वस्तीमध्ये कचरा टाकल्यामुळे विषाणूजन्य आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे हा कचरा शहराच्या बाहेर नेऊन टाकावा.
- डॉ. गुंजन गुल्हाने
शासकीय वैद्यकीय अधिकारी
कन्या शाळेच्या पटांगणामध्ये सांडपाण्याने खड्डे पडले आहेत. तेथे ठिकाणी हा गाळ टाकण्यात येत आहे. यानंतर पुढील कार्यवाही होईल.
- गीता वंजारी
मुख्याधिकारी, नगरपालिका