मशागतीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:16 PM2018-06-15T22:16:58+5:302018-06-15T22:17:13+5:30
पाच वर्षात हुलकावणी दिलेल्या पावसाचे यंदा वेळेवर होणारे आगमन बळीराजाला सुखावणारे ठरले. रोहिणीपाठोपाठ मृगातही मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला.
सूरज दहाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : पाच वर्षात हुलकावणी दिलेल्या पावसाचे यंदा वेळेवर होणारे आगमन बळीराजाला सुखावणारे ठरले. रोहिणीपाठोपाठ मृगातही मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला. तथापि, जिल्ह्यात २१ जूनपर्यंत तरी मान्सून सक्रिय होण्याची शक्यता नाही. गतवर्षी भाकितांनीच वाट लावल्यामुळे प्रत्यक्ष दमदार पाऊस होईस्तोवर पेरणी करणे धाडसाचे ठरेल, अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.
मागील शुक्रवारपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. मृगसरी बरसायला लागल्या. मात्र, हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. परंपरेप्रमाणे जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची या पावसामुळे लगबग वाढली आहे. उन्हाळ्यात नांगरणीनंतर उखरलेल्या जमिनीद्वारे किडींचे कोष बाहेर येऊन उन्हाने नष्ट होतात व बुरशीचाही नायनाट होतो. मात्र, या जमिनीची मशागत करण्यासाठी मान्सूनपूर्व पावसाची आवश्यकता असते.
यंदा मात्र रोहिणीमध्ये पाऊस झाल्यानंतर मृगातदेखील धो-धो पाऊस कोसळल्याने पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. शेताची वखरणी, काडीकचरा वेचणे, पेटवीणे आदी कामे सगळीकडे सुरू आहे. विशेष म्हणजे, यंदा बोंडअळीचा उपद्रव होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २० मेपर्यंत बीटी कपाशीच्या बियाण्यास विक्री बंद होती. त्यामुळे बागायती कपाशीच्या पेरणीदेखील यंदा झालेली नाही. मात्र, पुढच्या आठवड्यात पेरणीची सुरूवात होणार आहे. कृषितज्ज्ञांच्या मते, जिल्ह्यात किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करणे धाडसाचे ठरणार आहे.
२१ जूननंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता
मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत असले तरी २१ जूननंतर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा खंड राहणार असल्याची शक्यता खरी ठरली आहे. तापमानही बरेच वाढले आहे. त्यामुळे सध्या पेरणी केल्यास ती उलटण्याची भीती आहे. हवामानतज्ञांच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत कमी दाबाचा पट्टा किंवा चक्राकार वारे नसल्यामुळे १८ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होऊन तापमानवाढीची शक्यता आहे.