‘गॅस’ ग्राहकांच्या हक्कांची पायमल्ली
By admin | Published: October 28, 2015 12:26 AM2015-10-28T00:26:43+5:302015-10-28T00:26:43+5:30
आजच्या काळात स्वयंपाकासाठी ‘एलपीजी गॅस’ जीवनावश्यक झाला आहे. घरपोच सिलिंडर न मिळाल्यास ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागतो.
नागरिकांना कायद्याचे संरक्षण : ग्राहक जागृतीची गरज
अमरावती : आजच्या काळात स्वयंपाकासाठी ‘एलपीजी गॅस’ जीवनावश्यक झाला आहे. घरपोच सिलिंडर न मिळाल्यास ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागतो. रांगा लावून घरगुती गॅस सिलिंडर मिळवावे लागते. अशावेळी बहुतांश ठिकाणी गॅस ग्राहकांची कुचंबणा होते. हक्कांची जाणीवच नसल्याने त्यांच्या हक्कांची सर्रास पायमल्ली होताना दिसते.
स्वयंपाकाचा गॅस योग्य वजनाचा, सुरक्षित आणि वेळेवर प्राप्त होणे, हा जसा ग्राहकांचा हक्क आहे. त्याचप्रमाणे फसवणूक झाल्यास ग्राहकांना न्यायालयातही जाता येते. ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार देणेही ग्राहकांना शक्य आहे. गॅस वितरकांसह गॅस नियंत्रक, अन्नधान्य वितरण अधिकारी ते जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांपर्यंतचा पर्याय तक्रारीसाठी ग्राहकांपुढे उपलब्ध असतो. घरपोच येणारे सिलिंडर योग्य वजनाचे नसल्याची अनेक उदाहरणे आहेत, असे होत असेल तर नागरिकांनी विरोध करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी सरकारने त्यांना कायद्याचे संरक्षण दिले आहे. वितरकाची कायद्याची मदत घेऊन तक्रार करता येते, हे ग्राहकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
तर कंपनीकडून नुकसान भरपाई
सिलिंडर स्फोटामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यासग्राहक न्यायालयात जाऊ शकतो. कंपनीचा निष्काळजीपणा सिध्द झाल्यास कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते. सिलिंडरमुळे अपघात झाल्यास त्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाला देणे बंधनकारक आहे. या घटनेबाबत पोलिसांनाही सूचित करावे.
वस्तू घेणे बंधनकारक नाही
नवीन गॅस कनेक्शन घेताना वितरक सिलिंडरसोबत गॅसची शेगडी, तांदूळ, चहा पावडर, व्हॅक्यूम क्लिनर अशा वस्तू खरेदी करण्याची सक्ती करतात. असे आढळल्यास ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे संपर्क साधू शकतात.
सिलिंडरला असते ‘एक्सपायरी डेट’
गॅस सिलिंडर वापरण्याची अंतिम तारीख म्हणजे ‘एक्सपारी डेट’. त्या गॅस सिलिंडरमध्ये गॅसचा पुनर्भरणा किती तारखेपर्यंत करायचा, यासाठी ही तारीख महत्त्वपूर्ण असते. यानंतरही सिलिंडरमध्ये गॅस भरला जातो. असे सिलिंडर वापरण्यास असुरक्षित असतात. सिलिंडरच्या वरच्या भागात लोखंडी रिंग असते. हे रिंग चार लोखंडी पट्ट्यांच्या सहाय्याने जोडलेले असते. एका पट्टीच्या आतल्या बाजुस ‘एक्सपायरी डेट’ लिहिलेली असते. वर्षाच्या चार तिमाहींसाठी ‘एबीसीडी’ अशी मुळाक्षरे वापरून त्यापुढे वर्ष लिहिलेले असते. एखाद्या सिलिंडरवर ‘डी-२०१४’ असे अंकित असेल तर ते सिलिंडर सन २०१४ च्या शेवटच्या तिमाहीनंतर म्हणजे डिसेंबरनंतर वापरण्यात येऊ नये, असा संकेत असतो.