स्मशानभूमीत गॅस दाहिनी बंद, अंत्यसंस्काराचे नियोजन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:24+5:302021-05-31T04:10:24+5:30
हिंदू स्मशानभूमीवर ताण वाढला, आता कोरोना मृतदेहांचे अंत्यसंस्कार सरणावर अमरावती : येथील हिंदू स्मशानभूमी संस्थेने कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी शनिवारपासून ...
हिंदू स्मशानभूमीवर ताण वाढला, आता कोरोना मृतदेहांचे अंत्यसंस्कार सरणावर
अमरावती : येथील हिंदू स्मशानभूमी संस्थेने कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी शनिवारपासून गॅस दाहिनीचा वापर बंद केला आहे. त्यामुळे कोरोना आणि नैसर्गिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना नियोजन कोलमडले आहे. एकाच दिवसांनंतर हिंदू स्मशानभूमीच्या कामकाजावर ताण वाढला आहे. सरणावर एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना २७०० रुपये खर्च द्यावा लागत आहे.
हिंदू स्मशानभूमीत तिसरी विद्युत दाहिनी लावू नये, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी अगोदर मूक आंदोलन, त्यानंतर २८ मे रोजी विद्युत दाहिनीची तोडफोड करून सुटे भाग फेकण्यात आले. या घटनेनंतर राजापेठ पोलिसांनी सुमारे ४० आंदोलकांवर गुन्हे नोंदविले. भाजप, मनसे आणि स्थानिकांचा आंदोलनात सहभाग होता. अलीकडे कोरोना महामारीचे संकट कायम असून, जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूदेखील वाढत आहे. मृतांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश असला तरी उपचार आणि अंत्यसंस्कार अमरावती येथे करण्यात येत आहे. त्यामुळे आपसुकच हिंदू स्मशानभूमीवर अंत्यसंस्काराचा ताण वाढत आहे. परंतु, स्थानिकांच्या आंदोलनानंतर हिंदू स्मशानभूमी संस्थेने शनिवारपासून गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार करणे बंद केले आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांच्या परवनागीनंतरच गॅस दाहिनी सुरू केली जाईल, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे रविवारी कोरोना आणि नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. मृतांचे नातेवाईक अथवा आप्तस्वकीय हे हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला प्राधान्य देतात. मात्र, गॅस दाहिनी बंद ठेवण्यात आल्याने कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार करताना एकूणच नियोजन कोलमडल्याचे चित्र दिसून आले.
------------
दोन दिवसांपासून गॅस दाहिनी बंद ठेवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. त्यामुळे रविवारपासून कोरोना अथवा नैसर्गिक मृत्यू झालेल्यांचे सरणावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. रविवारी दुपारी ३ वाजतापर्यंत १० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- एकनाथ इंगळे, प्रबंधक, हिंदू स्मशानभूमी, अमरावती
-----------
विद्युत दाहिनीला विरोध कुणाचा?
येथील हिंदू स्मशानभूमी अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. विदर्भात ती नावाजलेली आहे. मात्र, गॅस दाहिनी व्यवस्थित सुरू असताना विद्युत दाहिनीला अचानक विरोध का, असा सवाल उपस्थित होत आहे. गॅस दाहिनीची चिमणी १५० फूट उंच असून, मृतदेहाची वाफ आणि राख पाण्यावाटे जाते. असे असताना अचानक आंदोलन उभे झाले आणि गॅस दाहिनी बंद पाडली. नेमके यामागे कुणाचा हात आहे, याचा शोध प्रशासनाने घ्यावा, अशी सुप्त चर्चा आहे. त्यामुळे या भागात साकारण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी तर विद्युत दाहिनीला विरोध होत नाही ना, असे बोलले जात आहे.