हिंदू स्मशानभूमीतील गॅस दाहिनी आठ दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:15 AM2021-02-16T04:15:36+5:302021-02-16T04:15:36+5:30
अमरावती: येथील हिंदू स्मशान भूमीत गेल्या आठ दिवसांपासून गॅस दाहिनी नादुरूस्त आहे. तांत्रिक कारणांमुळे ही गॅस दाहिनी बंद असल्यामुळे ...
अमरावती: येथील हिंदू स्मशान भूमीत गेल्या आठ दिवसांपासून गॅस दाहिनी नादुरूस्त आहे. तांत्रिक कारणांमुळे ही गॅस दाहिनी बंद असल्यामुळे कोरोना मृतांवर आता लाकडावरच अंत्यसंस्कार केला जात आहे. मात्र, स्मशान भूमीत एकाच भागात अंत्यविधी आटोपली जात असल्याने अंत्यसंस्कारांसाठी येणाऱ्यांमध्ये कोरोनाबाबत भितीचे वातावरण आहे.
हिंदू स्मशान भूमी संस्थेने लोकवर्गणी, महापालिका निधी, लोकप्रतिनिधीचा फंङ अशा वेगवेगळ्या उपक्रमातून मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रदूषण विरहीत गॅस दाहिनी प्रकल्प उभारला आहे. मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भावानंतर मृतांची संख्या देखील वाढली. त्यामुळे हिंदू स्मशान भूमीतील गॅस दाहिनी प्रकल्प उपयुक्त ठरला. एवढेच नव्हे तर अस्थी ठेवण्यासाठी लॉकर्स प्रणाली विकसीत केली आहे. गॅस दाहिनी आणि अस्थी लॉकर्स हे दोनही उपक्रम अमरावतीकरांसाठी लाभदायक ठरले. मात्र, मध्यंतती कोरोना संक्रमितांची संख्या कमी झाली आणि हिंदू स्मशान भूमीतील गॅस दाहिनीचा वापर कमी झाला. त्यामुळे काही दिवस गॅस दाहिनी बंद असल्याने आता ती नादुरूस्त आहे. त्यामुळे कोरोना मृतांवर अंत्यविधीसाठी गॅस दाहिनी नव्हे तर लाकडाचा वापर केला जात आहे. परिणामी अन्य मृतांच्या अंत्यविधी येणाऱ्यांना नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायवास मिळत आहे.
--------------
गॅस दाहिनीचे बर्नल गेले वर
हिंदू स्मशान भूमीतील गॅस दाहिनीचे बर्नल वर गेल्यामुळे ते नादुरूस्त झाले आहे. आठ दिवसांपासून कोरोना मृतांचे लाकडावरच अंत्यविधी करण्यात येत आहे. सकाळी ७ ते ९ वाजता दरम्यान अंत्यविधी आटोपले जात आहे. गॅस दाहिनीत तांत्रिक बिघाड आल्यामुळे त्याचा वापर करणे तूर्तास शक्य नाही. गॅस दाहिनीच्या दुरूस्तीसाठी दोन दिवसांपूर्वी कारागिर येवून गेले आहेत. मात्र, बिघाड मोठा असल्याने ते दुरूस्त करणे शक्य झाले नाही. पुढील दाेन दिवसात गॅस दाहिनीचे काम पूर्ण होऊन ते कार्यरत होईल, असे हिंदू स्मशान भूमीचे प्रबंधक एकनाथ ईंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
------
कोरोना मृतांचे तीन ओट्यांवर अंत्यविधी
हिंंदू स्मशान भूमीतील गॅस दाहिनी बंद असल्यामुळे कोरोना मृतांवर अंत्यविधी करण्यासाठी १३, १४ व १५ क्रमांकाच्या स्वतंत्र ओट्यांचा वापर होत आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून मृतांवर अंत्यविधी आटोपला जात असल्याचा दावा स्मशान भूमी संस्थांनच्या विश्वस्थांनी केला आहे. दर दिवसाला दोन ते चार कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
----------
गॅस दाहिनी दुरूस्तीसाठी नागपूर येथून कारागीर येऊन गेले आहे. तांत्रिक बिघाड असल्यामुळे किमान दोन दिवस लागतील. कोरोना मृतांवर स्वतंत्र ओट्या्ंचा वापर होत आहे.
आर. बी. अटल, अध्यक्ष, हिंदू स्मशान भूमेी संस्था