गॅस टँकर गळती; नागपूर-औरंगाबाद महामार्ग ४० तासांनंतर झाला मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:31 PM2018-08-03T13:31:22+5:302018-08-03T13:33:47+5:30
मुंबईवरून नागपूरच्या खापरी या औद्योगिक क्षेत्राकडे गॅस घेऊन जाणारा टँकर बुधवारी उलटल्यानंतर तब्बल ४० तासांनंतर शुक्रवारी सकाळी नागपूर-औरंगाबाद हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षितरित्या मोकळा झाला.
मोहन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: मुंबईवरून नागपूरच्या खापरी या औद्योगिक क्षेत्राकडे गॅस घेऊन जाणारा टँकर बुधवारी उलटल्यानंतर तब्बल ४० तासांनंतर शुक्रवारी सकाळी नागपूर-औरंगाबाद हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षितरित्या मोकळा झाला. या दुर्घटनेच्या स्थळापासून दोन्ही बाजूला किमान २० कि.मी. अंतरावर जड वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी वाहतुकीला झालेला खोळंबा व गॅस गळती बंद करण्यात संबंधित कंपनीकडून झालेल्या विलंबाबद्दल प्रशासनाकडून जाब विचारला जाणार आहे.
काय आहे घटना?
बुधवारी सकाळी साडे सहा वाजता नागपूरकडे हिंदुस्थान पेट्रोलियमचा गॅस टँकर क्र .एन एल ए ए 0४२६ देवगाव पासून एक किलोमीटर अंतर भारत पेट्रोल पंपाजवळ उलटला होता. घटना घडताच या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नागपुरकडून येणारी वाहतूक धामणगाव रेल्वेमार्गे वळविण्यात आली तर मुंबईवरुन येणारी जड वाहने चांदुररेल्वेमार्गे वळविण्यात आली. मात्र जड वाहतूक ठप्प झाल्याने तब्बल २० किलोमीटरपर्यंत वाहनांची रीघ लागली होती
दोन टन गॅस परिसरात पसरला
या घटनास्थळावर होत असलेल्या गळतीतून निघणाऱ्या गॅसने सुमारे दोन किलोमीटरचा परिसर वेढला होता. यामुळे येथील नागरिक भयभीत झाले होते. या भागातील विद्युत पुरवठाही तात्काळ बंद करण्यात आला होता. अपघातग्रस्त टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस भरण्यासाठी सात तास लागले.
हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मदत यंत्रणेला विलंब
मुंबई-पुणे महामार्गावर हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनीने मदत यंत्रणा जशी उभी केली आहे तशी ती नागपूर- औरंगाबाद महामार्गावरही असावी अशी गरज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या महामार्गावरून गॅस घेऊन जाणाऱ्या टँकरची संख्या दररोज सुमारे ४० च्या जवळपास आहे.
दोन किलोमीटरचा परिसर झाला निर्मनुष्य
गॅसची गळती सुरू झाल्यानंतर तो ज्वलनशील असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. विद्युत पुरवठा बंद करण्याची खबरदारी प्रशासनाने घेतलीच होती. या गॅसचा दुर्गंध सुमारे ५ कि.मी. च्या परिसरात जाणवत होता.