गस्तीला निघाले, बारमध्येच रमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:00 PM2018-06-22T23:00:31+5:302018-06-22T23:00:57+5:30
शासकीय वाहनाने येऊन खल्लार ठाण्याच्या पोलिसांनी येथील एका बारवर उशिरापर्यत एंजॉय केला. येथील एका वाळू माफियाने गुरुवारी सायंकाळी ही ‘ओली’ पार्टी दिल्याचे सांगण्यात आले व तोही यावेळी सोबत होता. पोलिसांच्या या पार्टीची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. ठाणेदारांनी यावर चूप्पी साधल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांच्यावर कारवार्ई करणार का, असा नागरिकांचा सवाल आहे.
किरण होले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : शासकीय वाहनाने येऊन खल्लार ठाण्याच्या पोलिसांनी येथील एका बारवर उशिरापर्यत एंजॉय केला. येथील एका वाळू माफियाने गुरुवारी सायंकाळी ही ‘ओली’ पार्टी दिल्याचे सांगण्यात आले व तोही यावेळी सोबत होता. पोलिसांच्या या पार्टीची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. ठाणेदारांनी यावर चूप्पी साधल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांच्यावर कारवार्ई करणार का, असा नागरिकांचा सवाल आहे.
दर्यापूर ठाण्याच्या हद्दीत कामानिमित्त खल्लार पोलिसांचे वाहन नेहमीच येते. गुरुवारीदेखील शासकीय कामासाठीच आले. पण, रात्री ९ च्या सुमारास पोलिसांचे शासकीय वाहन (एमएच २७ एए ०४२७) बारसमोर उभे करण्यात आले. मद्यपान केल्यानंतर पोलीस कर्मचारी जिभेचा तोल सुटल्याने असभ्य बडबड करीत होते. बारमधील उपस्थित यामुळे अवाक् होऊन पाहत होते. आम्ही पोलीस आहोत, याचा दम मात्र देण्यास ते विसरले नाहीत. त्यांना नीटसे उभेदेखील राहता येत नव्हते. या प्रकाराची चर्चा लगेच शहरात सुरू झाली. आॅन ड्युटी मद्यपान करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पेट्रोलिंग करण्यासाठी गुरुवारी रात्री शासकीय वाहनाने पोलीस गेले होते. काही गैरप्रकार घडला असल्यास कारवाई करू. या पोलिसांची नावे हवी असतील, तर ती माहितीच्या अधिकारात मागावावी लागतील.
- शुभांगी आगासे, ठाणेदार, खल्लार