दर्यापुरात अग्नितांडव दोन दुकाने जळून खाक
By admin | Published: June 2, 2014 12:36 AM2014-06-02T00:36:56+5:302014-06-02T00:36:56+5:30
दर्यापुरातील बनोसा परिसरात शॉर्टसर्किटमुळे दोन दुकाने जळून खाक झाली.
दर्यापूर : ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी दोन तास शर्तीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत रेडीमेड कपडे व प्रसाधन वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. ही घटना रविवारी पहाटे ५.३0 वाजताच्या सुमारास घडली. बनोसा परिसरात मेन रोडवर शेख साजीद मो. साबीर (३0) यांच्या मालकीचे साडी व रेडीमेड कपड्यांचे दुकान तर मो. अशपाक अ. रऊफ (३१) यांच्या मालकीचे बॉम्बे बँगल्स व कटलरीचे दुकान आहे. सर्वप्रथम बॉम्बे बँगल्सला रविवारी पहाटे आग लागली. आगीने रौद्ररुप धारण करीत बॉम्बे सेल कापडाचे दुकान जळाले. यामध्ये बॉम्बे सेल कापडाच्या दुकानाचे १५ लक्ष रूपयांचे तर बॉम्बे सेल बँगल्स व कटलरीचे १0 लाखांचे नुकसान झाले आहे. यात साड्या, रेडीमेड कपडे व इतर साहित्य जळून खाक झाले. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वेळीच दर्यापूर, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील अग्निशमनदलाचे बंब वेळीच पोहोचल्याने इतर दुकाने बचावलीत. आजबबाजूच्या दोन्ही दुकानांत अंदाजे कपडे व साड्या असा दीड कोटी रूपयांचा माल होता. घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळताच त्यांनी दर्यापूर पोलिसांना कळविले. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, ठाणेदार जे. के. पवार, सहायक पोलीस निरीक्षक अरूण अग्रवाल यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. यावेळी तलाठी स्वाती पांडे व गजानन पांडे, मंडळ अधिकारी रावसाहेब अवसरमोल यांनी पंचनामा केला. (प्रतिनिधी) जीवन प्राधिकरण आले मदतीला दर्यापुरात दोन दुकानांना लागलेली आग ही दोन्ही मुस्लिम बांधवांच्या दुकानाला लागली परंतु मदतीसाठी सर्व समाज एकवटला होता. घटनेची माहिती मिळताच सर्वप्रथम वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला तर जीवन प्राधिकरणशी संपर्क साधून नियोजित वेळेपूर्वी पाणीपुरवठा सुरु करण्यात आल्याने आगीवर पाणी ओतून आग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली. येथील नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मदतीचे हात सरसावले येथील रामेश्वर चव्हाण यांनी जेसीबी आणले व दुकानाचे शटर तोडले. संपूर्ण दुकाने टिनाच्या शेडचे असल्यामुळे टीनसुद्धा जळाले. बाळासाहेब हिंगणीकर, बळवंत वानखडे, नंदू गुल्हाने, ईश्वर बुंदेले, राजू बुंदेले, नगरसेवक असलम घाणीवाले, भाऊराव पारडे, पठाण, बबलू बयस, राजीक पहेलवान, सुभाष बुंदेले, रहेमानभाई व इतर अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. अचलपूरच्या घटनेची पुनरावृत्ती टळली अचलपूर शहरात कापड दुकनाला दोन महिन्यांपूर्वी आग लागून गोठवाल यांच्या एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. दर्यापुरातही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती. जिथे आग लागली त्या दुकानाला लागूनच शिवप्रकाश पनपालिया यांचे पूजा ड्रेसेस आहे व दुसर्या मजल्यावर त्यांचे निवासस्थान आहे. ते आपली पत्नी शांता पनपालिया, मुलगी पूजा व मुलगा आनंद यांच्यासोबत घरातच होते. आगीने रौद्ररुप धारण केले. धूर दिसताच मॉर्निंग वॉकसाठी जाणारे शिक्षक विल्हेकर यांनी पनपालिया यांना फोन करून या घटनेची माहिती दिली व लगेच पनपालिया यांनी घरातील पाणी आगीच्या दिशेने भिरकावले. नंतर पनपालिया कुटुंबाला राजू बुंदेले यांनी सुखरूप बाहेर काढले.