गौलखेडा बाजार, आडनदी पेपरलेस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:57 AM2018-12-14T00:57:16+5:302018-12-14T00:58:51+5:30
आदिवासीबहुल दुर्गम क्षेत्र असलेल्या मेळघाटात मोबाईलची रेंज पूर्णत: पोहोचली नसताना, तालुक्यातील आडनदी व गौलखेडा बाजार या दोन ग्रामपंचायती ‘पेपरलेस’ झाल्या आहेत. आदिवासींना प्रशासनाच्या या कार्यतत्परतेने सर्व व्यवहार आॅनलाईन करता येणार आहे.
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : आदिवासीबहुल दुर्गम क्षेत्र असलेल्या मेळघाटात मोबाईलची रेंज पूर्णत: पोहोचली नसताना, तालुक्यातील आडनदी व गौलखेडा बाजार या दोन ग्रामपंचायती ‘पेपरलेस’ झाल्या आहेत. आदिवासींना प्रशासनाच्या या कार्यतत्परतेने सर्व व्यवहार आॅनलाईन करता येणार आहे.
शहरी सोयी-सुविधांच्या कोसोदूर असलेला मेळघाट आता कात टाकू लागला आहे. ज्या गावात मोबाइलची रेंज पोहोचली, तेथे आदिवासींच्या उत्थानासोबत त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविले जात आहे. त्याअनुषंगाने चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत दोन ग्रामपंचायतींचे कामकाज पूर्णत: आॅनलाइन करण्यात आले आहे. तालुक्यातील आडनदी ग्रामपंचायत ५ नोव्हेंबर रोजी, तर ११ डिसेंबर रोजी गौरखेडा बाजार या ग्रामपंचायतीला ‘पेपरलेस ग्रामपंचायत’ घोषित करण्यात आले. चिखलदरा पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी मिताली सेठी यांनी मंगळवारी गौरखेडा बाजारचे ग्रामसेवक सुधीर भागवत, सरपंच महल्ले यांना प्रमाणपत्र दिले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती जयंत देशमुख, विस्तार अधिकारी संदीप देशमुख, माजी आमदार केवलराम काळे, जि.प. सदस्य दयाराम काळे, पं.स. सदस्य अखिलेश महल्ले, मुख्याध्यापक देवेंद्र्र ठाकरे, आनंद पडियार उपस्थित होते.
पाच ग्रामपंचायती प्रस्तावित
डोंगरमाथ्यावर, घाटवळणात, उंच कपाळाच्या कुशीत मेळघाटातील आदिवासी खेडी वसलेली आहेत. दूरसंचार विभागाकडून मोबाइल टॉवर लाइन टाकण्याचे काम सुरू असून, आजही अनेक खेडी मोबाइल रेंजच्या बाहेर आहेत. अशातही आडनदी व गौरखेडा बाजार नंतर टेंब्रुसोंडा, कूलंगणा, काटकुंभ, धरमडोह, आणि मोरगड या पाच ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली. जिल्ह्यात मोर्शी पंचायत समिती अंतर्गत ११ आणि अमरावती पंचायत समिती अंतर्गत दोन ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत. चिखलदरा तालुक्याने दोन ग्रामपंचायतीनंतर पुन्हा पाच ग्रामपंचायती पेपरलेससाठी प्रस्तावित केल्याने केल्याने जिल्ह्यात चिखलदरा पंचायत समितीचे कौतुक होत आहे.
कर, देयक सबकुछ संगणकावर
शासनाच्या ‘आपले सरकार’ केंद्र अंतर्गत ग्रामपंचायती पेपरलेस होत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या कंत्राटानुसार केंद्रचालक सोयीसुविधा पुरविणार आहेत. ग्रामपंचायती अंतर्गत जन्म-मृत्यू नोंद, ग्रामपंचायतीचे १ ते ३३ नमुने घर टॅक्स, पाणी पट्टी, ग्रामपंचायतीचे विविध कर, वीज देयकांसह ग्रामपंचायतीला प्राप्त होणारा निधीसुद्धा आता आॅनलाइन व्यवहारात आला आहे. याशिवाय आॅनलाइन व्यवहारात काही टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतींना मिळणार आहे.