शेंदूरजनाबाजार येथील शंतनूचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव
By admin | Published: October 3, 2016 12:18 AM2016-10-03T00:18:01+5:302016-10-03T00:18:01+5:30
तिवसा तालुक्यातील शेंदूरजनाबाजार येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील शंतनू ज्ञानेश्वर आसोडे...
तिवसा : तिवसा तालुक्यातील शेंदूरजनाबाजार येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील शंतनू ज्ञानेश्वर आसोडे या मिलीटरी सैनिक स्कूल पुलगावचा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा सीएसआयआर दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याला मानवविरहीत रेल्वे गेट या प्रोजेक्टसाठी ५० हजार रुपये रोख रक्कम व मानचिन्ह व प्रमाणपत्र असा पुरस्कार त्याला प्रदान करण्यात आला.
शंतनू आसोडे हा इंडियन मिलीटरी स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. मागील वर्षापासून त्याने एक प्रोजेक्ट तयार केला. मॉडर्न टेक्नॉलॉजी इन इंडियन रेल्वे या मानवविरहीत रेल्वे क्रॉसिंगवर स्वयंचलित रेल्वे गेट उघडणे व बंद होणे, रेल्वेच्या चालकाद्वारे विद्युत निर्मिती करणे तसेच प्लास्टिक व इतर कचऱ्याचे व्यवस्थापन आदी घटकांवर काम करण्यात आले. या प्रकल्पाची नोंद वैज्ञानिक तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था सी.एस.आय.आर. दिल्ली या संस्थेने घेतली.
भारतीय रेल्वेला हा प्रकल्प उपयोगी पडू शकणारा आहे, असे प्रतिपादन करून नरेंद्र मोदी यांनी शंतनू आसोडे सोबत पाच मिनिट झालेल्या चर्चेत प्रोजेक्टची प्रशंसा केली.
तसेच शंतनूने आपले मनोगत व्यक्त करताना आभाळाएवढ्या यशाचे श्रेय शाळेचे अध्यक्ष मनोज भेंडे, सचिव कृष्णा कडू, शिक्षक जगताप, मुख्याध्यापक रविकिरण भोजने, वर्गशिक्षक अतुल वाकडे, पर्यवेक्षक नितीन कोठे यांना दिले. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)