गावगुंडाची ग्रामसेवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:51 PM2019-03-13T22:51:39+5:302019-03-13T22:51:53+5:30
तालुक्यातील उसळगव्हाण येथे गावगुंडाने ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असलेल्या ग्रामसेवकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी आरोपीला अटक होईपर्यंत शासकीय कामकाज न करण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेने दिला आहे
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील उसळगव्हाण येथे गावगुंडाने ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असलेल्या ग्रामसेवकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी आरोपीला अटक होईपर्यंत शासकीय कामकाज न करण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेने दिला आहे
उसळगव्हाण येथे महेंद्र शेलार हे ग्रामसेवक ग्रामपंचायतीत असताना हरिश्चंद्र चंपत वानखडे (५२) हा गावगुंड तेथे आला आणि वडिलोपार्जित जागेच्या मोजणीची मागणी केली. जागा मोजणीचे अधिकार नझूल विभागाला असल्याचे शेलार यांनी सांगताच त्यांना मारहाण केली. हरिश्चंद्र वानखडे हा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी असून, त्यांच्या वडिलांची रिकामी जागा उसळगव्हाण येथे आहे. यापूर्वीदेखील त्याने ग्रामसेवकांना धमकी देण्याचे प्रकार केल्याचे पुढे आले आहे. तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात हरिचंद्र वानखडे याच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली.
आरोपीला अटक होईपर्यंत तालुक्यातील ग्रामसेवक शासकीय कामकाज करणार नाहीत, असा निर्णय तालुका ग्रामसेवक युनियनने घेतला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष नरेंद्र चौधरी यांनी दिली. ग्रामसेवकांनी दत्तापूर ठाण्याच्या उपनिरीक्षकांची भेट घेतली. ग्रामसेवक संघटनेचे एस.आर. चौधरी, एम.डी. सावळे, जितेंद्र बागेश्वर, जयंत खैर, सुधीर राऊत, संदीप आडे यांची यावेळी उपस्थिती होती.