गव्हाणकुंडच्या शाळेत निकृष्ट खिचडी !
By admin | Published: January 16, 2016 12:07 AM2016-01-16T00:07:44+5:302016-01-16T00:07:44+5:30
तालुक्यातील गव्हाणकुंड येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत अनेक दिवसांपासून निकृष्ट दर्जाची खिचडी विद्यार्थ्यांना दिली जात होती.
१८ जानेवारीला कुलूप : जि.प. सदस्यांची कारवाईची मागणी
वरूड : तालुक्यातील गव्हाणकुंड येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत अनेक दिवसांपासून निकृष्ट दर्जाची खिचडी विद्यार्थ्यांना दिली जात होती. याबाबत अनेक वेळा पालक, नगारिक तसेच जि.प. सदस्या अर्चना मुरुमकर यांनी तक्रार करूनही दखल घेतली नाही. अखेर बुधवारी जि.प. सदस्य मुरुमकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी अधिकाऱ्यांना पाचारण केले. पं.स. शिक्षणाधिकाऱ्यांनीसुध्दा आहार निकृष्ट असल्याचा अहवाल देऊन कारवाईचे आश्वासन दिले. १८ जानेवारीपर्यंत कारवाई झाल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वरुड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गव्हाणकुंड येथे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १७२ विद्यार्थी पटसंख्या आहे. आदिवासीबहुल भाग असल्याने गोरगरीब विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शासनाकडून शालेय पोषण आहारांंतर्गत खिचडी दिली जाते. परंतु ही खिचडी बेचव आणि निकृष्ट असल्याची ओरड पालकांसह नागरिकांकडून केली जात होती. या तक्रारीची दखल जिल्हा परिषद सदस्य अर्चना मुरुमकर, उपसरपंच प्रदीप मुरुमकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बावणे, सरपंचा पुष्पा कोडापेंसह ग्रामसदस्यांनी घेऊन पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेकडे वारंवार तक्रारी केल्यात. मात्र, दखल घेण्यात आली नव्हती. अखेर बुधवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान शाळेत जाऊन गटविकास अधिकारी रामकृष्ण पवार, गटशिक्षणाधिकारी व्ही.एन.इंगळे, केंद्रप्रमुखांना पाचारण करुन पंचनामा करण्यात आला. या शाळेत पुरक आहार देण्यात आला नाही. सादील खाते मुख्याध्यापकाच्या नावाने असून ते मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या नावाने करण्यात यावे यांसह खिचडी निकृष्ट दर्जाची असल्याचा अहवाल तक्रारकर्त्यांना दिला. पं.स.शिक्षणाधिकाऱ्यांनीसुध्दा निकृष्ट पोषण आहार असल्याचा अहवाल देऊन कारवाईचे आश्वासन दिले. १८ जानेवारीपर्यंत कारवाई न झाल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी अर्चना मुरुमकर, उपसरपंच प्रदीप मुरुमकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बावणे, सरपंच पुष्पा कोडापे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण युवनाते, रेखा मनोहरे, प्रतिभा गाडबैल आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
सभापतींच्या स्वगृहातील वास्तव
विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अर्चना मुरुमकर यांचे स्वगृह असलेल्या गव्हाणकुंडमधील जिल्हा परिषद शाळेतच सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत निकृष्ट दर्जाची खिचडी देण्यात येते. इतरही अनेक कामात अनियमितता असून विद्यार्थी संख्या अधिक दाखवून तांदूळ खुल्या बाजारात विकले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. शालेय पोषण आहाराचे वितरण करणाऱ्या ठेकेदारासोबत मुख्याध्यापकांचे संगनमत असल्याचेही बोलले जाते.