वर्षभरात साकारणार गव्हाणकुंडचा सौरऊर्जा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 10:16 PM2018-04-28T22:16:03+5:302018-04-28T22:16:23+5:30
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील २० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गुरुवारपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या कामाला दीड वर्षांचा कालावधी असला तरी वर्षभरात प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाईल, अशा विश्वास महावितरणच्या संचालकांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील २० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गुरुवारपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या कामाला दीड वर्षांचा कालावधी असला तरी वर्षभरात प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाईल, अशा विश्वास महावितरणच्या संचालकांनी व्यक्त केला.
महानिर्मिती अंतर्गत राज्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये सारखेच स्पेसिफिकेशन्स राहावेत, प्रत्यक्ष सौर वीज उत्पादनापासून वहनापर्यंतच्या विविध टप्प्यांवरील प्रशासकीय व तांत्रिक बाजूंवर सविस्तर चाचपणीसह प्रकल्पाची ई-निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून स्थापत्य स्वरूपाच्या कामांचा कार्यादेश कोराडीच्या स्थापत्य विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी २५ एप्रिल रोजी दिला. नागपूर विभागाचे मुख्य अभियंता (सौर) मिलिंद नातू यांच्या उपस्थितीत २६ एप्रिल रोजी गव्हाणकुंड येथे प्रत्यक्ष विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला.
प्रकल्पासाठी सुमारे ३० हेक्टर जागेच्या २० टक्के जमिनीचे समतोलीकरण, माती नमुने परीक्षण, माती परीक्षण अहवाल सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाºया विकसकाला डिझायनिंगकरिता पाठविण्यात आले. सोबतच २.५ किलोमीटरचा गव्हाणकुंड पोचरस्तादेखील पूर्ण करण्यात आला. प्राथमिक स्वरूपांच्या विकासकामांची प्राकलने यामध्ये सुरक्षा तार कुंपण, रस्ता कामे, नाल्यावरील पूल, उर्वरित जागेचे सपाटीकरण याबाबतचा पाठपुरावा कोराडी येथील स्थापत्य कार्यालयद्वारा मुंबई मुख्यालयाकडे सातत्याने करण्यात आल्याने कामाला गती मिळाली व आता प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी कामांना प्रारंभ झालेला आहे.
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट, नियमित आढावा
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत असलेला हा सौरऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. यामुळे मुख्यमंत्री या प्रकल्पाचा नियमित आढावा घेतात. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. अनिल बोंडे यांचाही सतत पाठपुरावा असल्याने प्रकल्पाला गती आली. महानिर्मितीने राज्यभरातील विविध सौरऊर्जा प्रकल्प उभारणीकरिता नागपूर, नाशिक, औरंगाबाद व पुणे अशा चार प्रादेशिक विभागांकरिता मुख्य अभियंत्याची स्वतंत्र पदे निर्माण केलेली आहेत.
वीज प्रकल्प उभारताना टप्पानिहाय कामांचे नियोजन करावे लागते. या प्रकल्पाची उभारणी व कार्यान्वयन कालावधी अठरा महिन्यांचा असला तरी प्रकल्प वर्षभरात पूर्ण करण्यात येईल.
- विकास जयदेव
संचालक, महावितरण (प्रकल्प)