गाविलगड किल्ला होतोय नामशेष (असाईनमेंट)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:19 AM2020-12-05T04:19:05+5:302020-12-05T04:19:05+5:30
फोटो पी ०४ गाविलगड नरेंद्र जावरे चिखलदरा : ऐतिहासिक व विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा स्थित गाविलगड किल्ल्याची वाताहत होत ...
फोटो पी ०४ गाविलगड
नरेंद्र जावरे
चिखलदरा : ऐतिहासिक व विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा स्थित गाविलगड किल्ल्याची वाताहत होत असून, त्याला नामशेष होण्यापासून वाचवण्याची गरज आहे. गवळीगड ते गाविलगड अशी अनेक स्थित्यंतरे बघणाऱ्या या किल्ल्यात अनेक इतिहासकालीन स्मृती दडल्या आहेत. मात्र, कधी निधी, तर कधी व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटींमध्ये किल्ल्याचे जतन थांबले आहे.
ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याला हजारो पर्यटक भेट देत असले तरी पुरातत्त्व विभागाच्यावतीने आवश्यक त्या ऐतिहासिक नोंदी व माहिती देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शोधकार्य केले गेले नसल्याचे वास्तव आहे. या किल्ल्यावर एकीकडे भिंतीची डागडुजी करण्याचे काम पुरातत्त्व विभाग करीत असताना, किल्ल्यातील दुसऱ्या भागाची पडझड मात्र सुरूच आहे. महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती व योग्य जतन होत नसल्याने येणाऱ्या काही वर्षांत त्याची नोंद कागदावर राहण्याची भीती इतिहासतज्ज्ञ व पर्यटकांनी वर्तविली आहे. या किल्ल्ल्याला गवळीगड ते गाविलगड असा इतिहास असून, बहमनी, इंग्रज, भोसले, मोगल, राजा बेनिसिंग अशा राज्यकर्त्यांनी वऱ्हाडची राजधानी असलेल्या या किल्ल्यावर राज्य केले आहे. किल्ल्यात राजा बेनिसिंगसह अनेकांची समाधी आहे. झुडपी जंगलामुळे त्या झाकल्या गेल्या आहेत. पुरातत्त्व विभागाच्यावतीने किल्ल्याचे ऐतिहासिक लिखाण करून फलक लावण्यात आले नसल्याने पर्यटकांना कुठल्याच प्रकारचा बोध होत नसल्याचे सत्य आहे.
बॉक्स
ऐतिहासिक महत्त्व
१) बाराव्या शतकात गवळीगड असलेल्या गाविलगड किल्ल्याची मुहूर्तमेढ इ.स. १४२५ मध्ये बहमनी शासक अहमदशहा वली यांनी ठेवली.
२) राज्यातील इतर किल्ल्यांपेक्षा सर्वाधिक मोठ्या तोफा गाविलगड किल्ल्यात आहेत. २५ फूट लांब व ३२ टन वजनाच्या तोफा दुर्लक्षित पडल्या आहेत. किल्ल्यातील अनेक लहान तोफा बेपत्ता झाल्या आहेत.
३) गाविलगड किल्ल्यावरून हैदराबाद, अहमदनगर येथील पाथर्डी, माहूर व बैतूलच्या खेरला किल्ल्यावर नजर ठेवली जात होती.
४) गाविलगड किल्ल्याच्या खालच्या भागात दारूगोळा बनवण्याचा कारखाना होता.
५) किल्ल्याला मछली, वीरभान, शार्दुल व दिल्ली असे दरवाजे असून, त्यावर अत्यंत कोरीव व महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. यावर पुरातत्त्व विभागाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याने पर्यटकांना काहीच बोध होत नाही.
६) किल्ल्यातील जुम्मा मशीद ही एकमेव वास्तू नामशेष होणाऱ्या गाविलगड किल्ल्याचे वैभव ठरत असून, त्याच्या दुरुस्तीची गरज आहे.
बॉक्स
पाच वर्षांपासून डागडुजी, सहा महिन्यांपासून काम बंद
पुरातत्त्व विभागाच्यावतीने पाच वर्षांपासून गाविलगड किल्ल्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यावर जवळपास दोन कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. पैकी एक कोटी रुपये खर्च झालेत. किल्ल्याच्या वास्तू वगळता वनजमिनीवरील कामाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ‘ब्रेक’ लावला आहे. झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप इतिहासतज्ज्ञांनी केला आहे.
कोट
इतिहासकालीन गाविलगड किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यातील वास्तू कोसळत आहेत. काम संथ गतीने सुरू आहे. किल्ल्याविषयीची ऐतिहासिक माहिती कुठेच लिहिण्यात आलेली नाही. पुरातत्त्व विभागाने योग्य दखल घेण्याची गरज आहे.
अनिरुद्ध पाटील, इतिहासतज्ज्ञ
कोट
पाच वर्षांपासून किल्ल्याची डागडुजी, स्वच्छता सुरू आहे. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांची कामे करण्यात आली. कोरोनामुळे काम बंद होते. त्यानंतर व्याघ्र प्रकल्पाच्या आदेशाने सहा महिन्यांपासून बंद आहे. दोन कोटींचा निधी शासनातर्फे मिळाला. पैकी एक कोटी रुपये खर्च झाले.
मिलिंद अंगाईतकर, कंझर्व्हेशन अधिकारी, पुरातत्त्व विभाग
कोट
किल्ल्याच्या कुठल्या कामाला बंद करण्याचे आदेश नाही. वनजमिनीवर विनापरवाना सुरू केलेले काम आवश्यक त्या परवानगी घेऊन करण्याचे आदेश दिले आहेत.
पीयूषा जगताप, उपवनसंरक्षक, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा