विद्यापीठात साधारण निधीची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:34 PM2019-03-05T22:34:55+5:302019-03-05T22:35:21+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा सुरू आहे. उत्पन्नाची साधने वाढविण्याऐवजी खर्चावर अधिक भर देत असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपासून साधारण निधीवर विद्यापीठाचा डोलारा चालत असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा सुरू आहे. उत्पन्नाची साधने वाढविण्याऐवजी खर्चावर अधिक भर देत असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपासून साधारण निधीवर विद्यापीठाचा डोलारा चालत असल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यापीठात साधारण निधीत विद्यार्थ्यांकडून येणारे विविध शुल्क, परीक्षा अर्जाची रक्कम व अन्य रोख जमा होते. मध्यंतरी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला असताना याच शीर्षातून कर्मचाऱ्यांचे वेतन देत मार्ग काढला. मात्र, २ मार्च रोजी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अनेक सदस्यांनी साधारण निधीची होणारी उधळण थांबविण्याची मागणी केली. साधारण निधीत येणारा पैैसा हा विद्यार्थ्यांच्या हक्काचा असतो, अशी भावनादेखील व्यक्त करण्यात आली. आवश्यक असल्यास खर्च करा, पण साधारण निधीला छेद लावू नका, असे मत नोंदविण्यात आले. याशिवाय बजेटमध्ये शीर्षनिहाय निधीची तरतूद असतानाही खर्च होत नसल्याची बाब उपस्थित करण्यात आली. त्यामुळे खर्चावर बंधन घालण्यासह प्रात्यक्षिक परीक्षा निरीक्षकांवर वर्षाकाठी होणाºया साडेतीन कोटींवर बंधन आणण्याची मागणी करण्यात आली. अनावश्यक खरेदी थांबविल्यास खर्चावर निर्बंध येतील, असा सूर व्यवस्थापन परिषदेच्या बहुतांश सदस्यांनी आवळला.
येत्या अर्थसंकल्पात साधारण निधीत ९० ते ९२ कोटी जमा होण्याचे प्रस्तावित आहे, तर तितकीच रक्कम खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. याबाबत कुठला निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जमा होणारी अंदाजित रक्कम
परीक्षा शुल्क - ३३ कोटी ६२ लाख ८५ हजार, विद्यार्थ्यांकडून येणारे शुल्क - ३८ कोटी २९ लाख ४४ हजार, महाविद्यालयांचे शुल्क १३ कोटी ४७ लाख ८९ हजार ५९ रुपये, शैक्षणिक विभागाचे शिक्षण व इतर शुल्क - १७ कोटी ५४ लाख १३ हजार, शारीरिक शिक्षण व रंजन मंडळ - १३ कोटी २८ लाख ९७ हजार, विविध खात्यावरील व्याज रक्कम २८ लाख ६८ हजार ३५१ रूपये, इतर किरकोळ प्राप्ती - १३ कोटी ५८ लाख ४८ हजार, वेतन व इतर कपात - २९ लाख ३१ हजार, कर्ज व अग्रीम - २१ कोटी ३९ लाख, केंद्रीय प्रवेश ८ लाख ४३ हजार ६३५ रुपये.
साधारण निधी कमी झाला, असे म्हणता येणार नाही. परंतु, उत्पन्नात वाढ व्हावी, याबाबत उपाययोजना करण्याचे सूचविले आहे. अनावश्यक खर्चावर अकुंश लावण्याची मागणी केली आहे. यावर्षी अंदाजपत्रक विद्यार्थिभिमुख तयार केले जाणार आहे.
- प्रदीप खेडकर, सदस्य
व्यवस्थापन परिषद, विद्यापीठ.