अपघातामधील मृतांना आर्थिक मदत मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2016 12:08 AM2016-01-05T00:08:26+5:302016-01-05T00:08:26+5:30
तिवसा ते गुरुकुंज मोझरी दरम्यान ३१ डिसेंबरला कृषी विभागाच्या मद्यधुंद चालकाने दुचाकीला धडक दिल्याने बहिन-भाऊ ठार झाले.
मागणी : कृषी सहसंचालकांच्या दालनात ठिय्या
अमरावती : तिवसा ते गुरुकुंज मोझरी दरम्यान ३१ डिसेंबरला कृषी विभागाच्या मद्यधुंद चालकाने दुचाकीला धडक दिल्याने बहिन-भाऊ ठार झाले. चालकांसह वाहनात उपस्थित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व ग्राहकांना आर्थिक मदत देण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांची विभागीय कृषी सहसंचालक शू.श. सरदार यांचेकडे केली.
कृषी विभागाच्या मद्यधुंद चालक गोडबोले यांच्यासह भांडार लिपिक वानखडे हे कार्यालयाच्या स्टेशनरी आणायला शासकीय वाहनाने नागपूर येथे २० डिसेंबरला गेले होते. परत येताना या वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये बहिन-भाऊ ठार झालेत. या मद्यपी चालकाने दोन परिवारांना उद्ध्वस्त केले. त्याच्यासह लिपिक याला तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी मृतकाचे नातेवाईक रामदास रहाटे, अजीज पटेल, प्रदीप गौरखेडे, अतुल भामोदकर, संतोष महात्मे, राहुल डहाके, अतुल केने आदींनी केली.