लग्न झाले, हनिमूनला जाण्यासाठी हवाय ई-पास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:27+5:302021-06-09T04:15:27+5:30
अमरावती : कोरोन संक्रमण रोखण्यासाठी शासनाने दुसऱ्या लाटेत कडक निर्बंध लागू केले होते. यामुळे शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयातील विशेष ...
अमरावती : कोरोन संक्रमण रोखण्यासाठी शासनाने दुसऱ्या लाटेत कडक निर्बंध लागू केले होते. यामुळे शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयातील विशेष शाखा (एसबी) व सायबर सेलकडे प्रवासाची परवानगी मागण्याकरिता अर्जांचा पाऊस पडू लागला होता. लग्नाला जायचे आहे. अंत्यसंस्कारला जायचे आहे. मुलांना सोडून द्यायचे आहे. आई-वडिलांच्या उपचाराकरिता जायचे आहे. इतकेच नव्हे, तर अनेकांचे लॉकडाऊनमध्ये लग्न उरकल्याने हनिमूनला जायचे असल्याचे कारण देत ई-पास मागण्यात आल्याची बाब पुढे आली. मात्र, पोलिसांनी ज्यांना खरेच गरज आहे, अशांनाच ई-पास दिली. मात्र, आता राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक झाल्याने ई-पासची गरज नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २२ एप्रिल ते १ जून २०२१ दरम्यान पोलीस आयुक्तलयाकडून ई-पास मिळविण्याकरिता १४ हजार ७१४ जणांनी परवानगीचे ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी केवळ २ हजार ३३७ जणांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांनी सांगितले. तब्बल १२ हजार ३८१ जणांचे अर्ज सबळ कारणाऐवजी तसेच पोलिसांना ई- पास मिळविण्याचे कारण न पटल्याने नाकारण्यात आले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने प्रवासासाठी ई-पास काढणे बंधनकारक केले होते. त्यामुळे अकारण प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले होेते. अंत्यसंस्कारासाठी जायचे असल्यास, रुग्णाला रुग्णालयात घेऊन जायचे असल्यास किंवा अत्यावश्यक कारणासाठीच पोलिसांकडून ई-पास मंजूर केले जात आहेत. याशिवाय माझे लग्न झाले आहे, हनिमूनला जायचे आहे, लहान मुलांना सोडायला जायचे आहे आदी कारणे सांगून ई-पास मागणाऱ्यांचे अर्ज नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. योग्य कारण असेल, तरच प्रवासाची परवानगी पोलीस विभागाकडून दिली गेली.
पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस उपआयुक्त ( ॲडमिन) विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक (विशेष शाखा) नीलिमा आरज, सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अर्जांची पडताळणी व परवानगी देण्याचे काम सुरु होते.
बॉक्स:
आता राज्य सीमा ओलांडण्यासाठी अर्ज
दुसऱ्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर आता नागरिकांना राज्यांतर्गत फिरण्यास ई-पासची आवश्यकता नाही. मात्र, राज्याची सीमा ओलांडण्यासाठी त्या-त्या राज्यांच्या सीमारेषांवर ई-पास तपासणी केली जाईल व निर्णय घेतला जाईल.
बॉक्स:
ई-पास मिळविण्याकरीता वाटेल ते
ई-पास मिळविण्यासाठी पोलीस विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागला. या अर्जात अनेक जण प्रवासाची परवानी मिळविण्याकरीता काहीही कारे सांगत असल्याचे पोलिसांच्या निदशर्नास आले. लग्नाला जायचे आहे. फिरायला जायचे आहे. मुलाला भेटण्यासाठी जायचे आहे. नवीन लग्न झाले म्हणून महाबळेश्वर किंवा इतर पर्याटनस्थळी हनिमूनला जायचे असल्याचे कारण सांगितले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलिसांनी संयमित भूमिका निभावून पास नाकारल्याची माहिती आहे.
मंजूर केलेले अर्ज - २,३३७
नामंजूर अर्ज - १२,३८१
ई-पाससाठीचे अर्ज - १४,७१४
कोट
सबळ कारणाशिवाय ई-पास मंजूर करू नये, असे वरिष्ठांचे आदेश होते. त्यामुळे कोरोना नियमावलीचे पालन करून १२ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांचे अर्ज नाकरण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली.
नीलिमा आरज, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (विशेष शाखा)