‘प्रहार’च्या भावना आरपारच्या, तोडाफोड करून बाहेर पडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2022 11:50 PM2022-10-30T23:50:56+5:302022-10-30T23:51:30+5:30
आमदार बच्चू कडू हे प्रसारमाध्यमांशी बाेलताना आमदार रवि राणा यांनी केलेल्या बदनामीचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यात मांडणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्या दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत, एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा असे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आमदार रवि राणा व बच्चू कडू यांच्यातील वाद हा शिगेला पोहोचला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रविवारी या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र, प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत. काय आहे ते तोडाफोड करून बाहेर निघणार, असा गौप्यस्फोट आमदार बच्चू कडू यांनी रविवारी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्री ८ वाजता मुंबईला निघाल्याची माहिती कडू यांनी दिली.
आमदार बच्चू कडू हे प्रसारमाध्यमांशी बाेलताना आमदार रवि राणा यांनी केलेल्या बदनामीचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यात मांडणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्या दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत, एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा असे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. मात्र, आमदार रवि राणा अत्यंत नीच पद्धतीने बोलला आहे. मला असे वाटते, आता त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला तर ठीक, त्याने जे काही आरोप केले, त्यासंदर्भात त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे समाधान झाले, तर १ नोव्हेंबर रोजी ‘अल्टिमेटम’बाबतचा विचार करू आणि जी बदनामी केली आहे ती परत द्यावी, विषय संपला, असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
आमदार रवि राणा मुंबईला पोहोचले
आमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यात खोके, किराणा वाटपावरून सुरू झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. राणा, कडू या दोन्ही आमदारांना भेटीसाठी वेगवेगळी वेळ दिली आहे. त्यानुसार आमदार रवि राणा हे रविवारी सकाळी ९.२५ वाजेच्या सुमारास मुंबईला गेले. आमदार बच्चू कडू यांनी रविवारी रात्री ८ वाजता मुंबईला निघणार असल्याचे सांगितले.
कडू, राणा यांच्यात मनोमीलनाचे संकेत
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी रवि राणा व बच्चू कडू यांना रविवारी मुंबईला बोलावले. त्यांच्यात उफळलेला वाद शिंदे-फडणवीस दूर करण्याची व रात्री उशिरा होणाऱ्या बैठकीत मनोमीलन होण्याची दाट शक्यता आहे.