रखडलेली कामे त्वरित मार्गी लावा, अन्यथा अन्नत्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:31+5:302021-06-11T04:09:31+5:30
वरूड : निधी मंजूर असूनही शहरात दीड वर्षांपासून कोणतेही विकासात्मक काम झाले नाही. सत्ताधारी एकमेकांवर आरोप करण्यात ...
वरूड : निधी मंजूर असूनही शहरात दीड वर्षांपासून कोणतेही विकासात्मक काम झाले नाही. सत्ताधारी एकमेकांवर आरोप करण्यात गुंग आहेत. नगर परिषदेमध्ये २०१९-२० चा निधी अजून खर्च केला गेला नाही. येत्या आठ दिवसांत कामाला सुरुवात केली नाही, तर अन्नत्याग आंदोलन छेडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
निवेदनानुसार, सन २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी १ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. रक्कम २ जून २०२० रोजी नगर परिषदेच्या खात्यामध्ये जमासुद्धा झाली आहे. या कामासंदर्भात २४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या व आ. भुयार यांच्या लेखाशीर्ष (४२१७-०६०३) अंतर्गत वरूड नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली . यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून ही विकासकामे त्वरित पूर्ण करावी, अन्यथा लोकांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषदसमोर अन्नत्याग आंदोलन करणार, असा इशारा मुख्याधिकारी रवींद्र पाटील निवेदनातून दिला आहे. यावेळी नगरसेवक महेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जितेंद्र शहा, कार्याध्यक्ष स्वप्निल आजनकर, नगरसेविका फिरदोसजहाँ अन्सार बेग, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर काळे, निखिल बन्सोड आदी उपस्थित होते.