लक्षणे दिसल्यास तत्काळ आरटीपीसीआर चाचणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:36+5:302021-04-30T04:15:36+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असताना प्रत्येकाने आपली तसेच कुटुंबीयांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ताप, ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असताना प्रत्येकाने आपली तसेच कुटुंबीयांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ताप, घसादुखी, अंगदुखी, अशक्तपणा, श्वास घेण्यास अडचण, जिभेची चव जाणे किंवा कुठलाही शारीरिक त्रास आदी लक्षणे दिसल्यास सरकारी अथवा खासगी रुग्णालयात जाऊन तत्काळ तपासणी करावी. कोरोना संबंधीची आरटीपीसीआर चाचणी करून स्वत:सह कुटुंबाला व समाजाला संक्रमणापासून वाचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे प्रमुख, इंडियन मेडिकल असोसिएशन, खासगी डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसह रुग्णांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या या प्रयत्नांना सहकार्य करीत कोविड ॲप्रोप्रियेट बियेव्हीएअर अंगीकारावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
बॉक्स
घरगुती ईलाजापेक्षा रुग्णालयात औषधोपचार करावा
प्रशासनाव्दारे जिल्ह्यात लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन स्वत:चे व कुटुंबीयांचे लसीकरण करून घ्यावे. ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास अडचण, घसादुखी, अंगदुखी, जिभेची चव जाणे आदी लक्षणे दिसल्यास त्यावर घरगुती इलाज करण्यापेक्षा तत्काळ रुग्णालयात जाऊन औषधोपचार करावे. स्वत:सह इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.