कालबाह्य औषधसाठ्यावर घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:09 AM2021-01-01T04:09:20+5:302021-01-01T04:09:20+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कालबाह्य औषधसाठा पडून असल्याची बाब पदाधिकारी व सदस्यांच्या भेटीत ...
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कालबाह्य औषधसाठा पडून असल्याची बाब पदाधिकारी व सदस्यांच्या भेटीत उघड झाली. या प्रकरणी गुरुवारी जिल्हा परिषद स्थायी समितीत सदस्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरीत जाब विचारला.
जिल्हा परिषदेकडून जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना औषधसाठा पुरविला जातो. तो पुरविताना याबाबत संबंधित ठिकाणी स्टॉक रजिस्टरवर औषधाबाबत सर्व प्रकारच्या नोंदीही केल्या जातात. असे असताना कालबाह्य झालेला औषधसाठा आरोग्य केंद्रात दर्शनी भागातील ठिकाणी कपाटात किंवा बॉक्समध्ये ठेवला जातो. अशावेळी रुग्णाला चुकून कालबाह्य औषध दिले गेल्यास त्यांचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत निष्काळजीपणा का केला जाताे, असा प्रश्न सदस्य जयंत देशमुख यांनी मांडला. यावर अध्यक्ष बबलू देशमुख यांनी जिल्हा आरोग्याधिकारी यांच्यासमोर प्रश्नांची सरबत्ती करीत यापुढे सर्व आरोग्य केंद्रातील औषधसाठा कालबाह्य होण्याअगोदर सहा महिन्यांपूर्वीच याबाबत नियोजन करावे, औषधसाठा कालबाह्य झाल्यास याबाबत शासनाच्या सूचनेप्रमाणे त्याची विल्हेवाट लावावी; जेणेकरून कुठलीही गंभीर घटना होणार नाही. याअनुषंगाने योग्य कारवाई करावी, असे निर्देश सभेत डीएचओंना दिलेत. विशेष म्हणजे यात कुचराई केल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही सदस्यांनी केली. यावेळी शिक्षण, जलसंधारण, महावितरण, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, रोजगार हमी योजना, घरकुल योजना, आदी विभागांच्या मुद्द्यावर सभेत वादळी चर्चा करून उपस्थित प्रश्नांचे निराकरण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अध्यक्षांनी दिल्या आहेत. सभेला अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, पूजा आमले, सदस्य सुनील डिके, सीमा घाडगे, सीईओ अमोल येडगे, आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
बॉक्स
झेडपीच्या रस्त्यावर जड वाहतुकीस मनाई
जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ता असलेल्या चिखलदरा तालुक्यातील बाेराळा ते भिलखेडा रस्त्यावरून एनओसी न घेताच परतवाडा ते अंजनगाव रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून जड वाहतूक केली जात आहे. परिणाम हा रस्ता खराब झाला आहे. सदर रस्ता दुरुस्त करून देण्यास कंत्राटदार तयार हाेत नाही; त्यामुळे संबंधिताविरुद्ध पथ्रोट पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र तरीही जड वाहतूक सुरू असल्याने या वाहतुकीस मनाई करण्याचे आदेश अध्यक्षांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता निला वंजारी यांना दिले आहेत.