नानोरी फाटा येथील बस थांब्याला घाटलाडकीचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:12 AM2020-12-06T04:12:15+5:302020-12-06T04:12:15+5:30
राष्ट्रीय महामार्ग वरील प्रकार; दुरुस्तीची मागणी चांदूर बाजार : मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर नानोरी फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग ...
राष्ट्रीय महामार्ग वरील प्रकार; दुरुस्तीची मागणी
चांदूर बाजार : मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर नानोरी फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागातर्फे बस थांबा बनविण्यात आला आहे. मात्र, या बस थांब्याच्या भिंतीवर घाटलाडकीचे नाव झळकत आहे. नानोरी फाट्यावरून मध्यप्रदेशला जोडणारा सर्वात कमी अंतराचा मार्ग आहे. मात्र, या जागी कोणतेच गावाचे फलक लावले नसल्याने नवख्या वाहनचालकांची चांगलीच गोची होत आहे.
मोर्शी ते चांदूर बाजार मार्गे परतवाडा हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग ३५३ अ म्हणून ओळखला जात आहे. अनेक ठिकाणी प्रवासी निवारेसुद्धा उभारण्यात आले आहेत. या प्रवासी निवाऱ्याला त्या गावाचे नाव देण्यात आले आहे. चांदूर बाजार शहराच्या मोर्शी मार्गावरील अर्धा किलोमीटर अंतरावर नानोरी फाटा आहे. या फाट्यावरून सर्वप्रथम नानोरी, सोनोरी, सुरळीनंतर १५ किलोमीटर दूर घाटलालकी, रेडवा, चिचकुंभ, श्रीक्षेत्र नागरवाडी, वणी गाव आहे. मात्र, या फाट्यावर या गावाचे कोणतेच फलक लावले नसल्याने वाहनचालकांना तसेच प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वणी येथील उपसरपंच मंगेश देशमुख व प्रफुल नवघरे यांनी या फाट्यावर गावांच्या नावाचे फलक लावण्याची अनेकदा मागणी केली. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने नऊ महिन्यांपासून फाट्यावर साधे फलकसुद्धा लावण्यात आले नाही.
पाठपुरावा बेदखल
नानोरी फाट्यावर उभारण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्याला लगतच्या गावाचे नाव न देता चक्क १५ किलोमीटर दूर असलेल्या घाटलाडकी गावाचे फलक लावण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग व कंत्राटदारांची झालेली चूक मंगेश देशमुख व प्रफुल नवघरे यांनी अनेकदा लक्षात आणून दिली. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या लेटलतिफीने या मार्गावरून मध्य प्रदेश व अन्य गावांकडे जाताना नागरिकांची चांगलीच गोची होते. यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ प्रवासी निवाऱ्यावरील नाव दुरुस्त करावे तसेच नानोरी फाट्यावर दर्शनी भागात गावाच्या नावाचे फलक लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांतर्फे केली जात आहे.
----------------------