नि:शब्द कोठडी पाहून गहिवरले वनकर्मचारी !

By admin | Published: February 23, 2016 12:02 AM2016-02-23T00:02:48+5:302016-02-23T00:02:48+5:30

१४ जणांचा बळी घेणारे ते नरभक्षी. त्यांच्याबद्दल कुणाला प्रेम कसे असणार?, जिव्हाळादेखील कसा निर्माण होणार?

Ghiwarele vanworkers looking at the masked cell! | नि:शब्द कोठडी पाहून गहिवरले वनकर्मचारी !

नि:शब्द कोठडी पाहून गहिवरले वनकर्मचारी !

Next

अमरावती : १४ जणांचा बळी घेणारे ते नरभक्षी. त्यांच्याबद्दल कुणाला प्रेम कसे असणार?, जिव्हाळादेखील कसा निर्माण होणार? त्यांच्या डरकाळ्या, चवताळणे, चेहऱ्यावरील रागीट भाव, कोठडीत फेऱ्या मारताना दिसणारा कठोर आविर्भाव...सारेच अंगाचा थरकाप उडविणारे. पण, तब्बल सात वर्षे त्यांच्या संगतीने घालविल्यानंतर वनकर्मचाऱ्यांना त्यांची सवय झाली होती. त्यांच्या गुर्मीत वावरण्याचा देखील एव्हाना या वनकर्मचाऱ्यांना सराव झाला होता. त्यामुळेच असेल कदाचित. सोमवारी या ‘खुनी’ बिबट्यांना निरोप देताना वडाळी वनउद्यानातील कर्मचारी हळवे झाले होते. एकीकडे मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचा आनंद होता तर दुसरीकडे अनामिक रूखरूखही होतीच. चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली परिक्षेत्रातून ३१ जानेवारी २००९ रोजी दोन नरभक्षक बिबट्यांना वडाळी वनउद्यानातील कोठडीत बंदिस्त ठेवण्यात आले होते.

१४ जणांचे घेतले बळी
अमरावती : या दोन बिबट्यांवर १४ मनुष्यांचा बळी घेतल्याचा आरोप होता. तब्बल सात वर्षे कोठडीत घालविल्यानंतर सोमवारी ‘शेरू आणि राजा’या दोन्ही बिबट्यांना नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालय, प्राणी बचाव केंद्रात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बिबट्यांना स्थलांतरित करताना कोणतीही दुखापत होऊ नये, यासाठी पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू तैनात करण्यात आली आहे.
सलग सात वर्षे शेरू आणि राजाचा आहार, पाणी, सुरक्षा व स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणारे वनकर्मचारी किशोर डहाके बिबट्यांच्या सुरक्षिततेकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवत होते. वडाळी वनउद्यानातील नरभक्षक बिबट्यांबद्दल वन्यजीवप्रेमींना प्रचंड आर्कषण असल्याने कधीकाळी त्यांना बघण्यासाठी मोर्ठी गर्दी व्हायची. मात्र, शेरु व राजाला मनुष्यांबद्दल प्रचंड घृणा होती. त्यामुळे ते माणसे बघताच आक्रमक व्हायचे. हल्ला करण्यासाठी सज्ज व्हायचे. त्यामुळे पुढे वन्यप्रेमींना कोठडीजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला. पश्चातची सलग सात वर्षे या दोन्ही नरभक्षक बिबट्यांना त्यांच्या दिमतीला असलेल्या वनकर्मचाऱ्यांसोबत घालवावी लागली. येथे नेमलेले सुरक्षा रक्षक सांगतात, काही कालावधीनंतर या नरभक्षक बिबट्यांच्या प्रवृत्तीतही फरक पडला होता. ते थोडे शांत झाले होते. दररोज सकाळ आणि संध्याकाळ या बिबट्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना एव्हाना त्यांचा लळा लागलाय, अल्पसा का होईना जिव्हाळा निर्माण झालाय. त्यामुळेच आता शेरू व राजा ला कायमचा निरोप देण्याचा क्षण येऊन ठेपल्याने हे कर्मचारी गहिवरले होते.

शेरू, राजाला हळवा निरोप : नरभक्षक बिबट्यांची नागपूरला रवानगी
‘त्यांना’ शनिवारी होता मांसाहार वर्ज्य
वडाळीच्या वनउद्यानात तब्बल सात वर्षे कोठडी भोगणाऱ्या दोन्ही नरभक्षक बिबट्यांना दर शनिवारी उपवास असे. त्यांना शनिवारी मांस दिले जात नव्हते. हा निर्णय पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घेण्यात आल्याचे वनकर्मचारी किशोर डहाके यांनी सांगितले.

भाषा कळली म्हणून वाचले प्राण
शेरू व राजाशी जुळलेल्या अनेक आठवणी त्यांचा सांभाळ करणारे वनकर्मचारी किशोर डहाके यांनी ‘लोकमत’ला सांगितल्या. ते म्हणाले, सन २००९ मध्ये एकदा कोठडीतील एका पिंजऱ्याचे दार उघडेच राहिले. यावेळी दुसऱ्या पिंजऱ्याची सफाई सुरू होती. त्यामुळे शेरू अचानक समोर आला. पाचावर धारण बसली. मात्र, ‘खाली बस’ असे म्हणताच तो खाली बसला आणि माझे प्राण वाचले. सततच्या संपर्काने त्याला माझी भाषा कळू लागली होती. त्याला भाषा कळली म्हणून जीव वाचला. अन्यथा अनर्थ झाला असता.

Web Title: Ghiwarele vanworkers looking at the masked cell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.