मनपाच्या मानगुटीवर ‘हायड्रोलिक आॅटो’चे भूत
By Admin | Published: May 29, 2017 12:02 AM2017-05-29T00:02:41+5:302017-05-29T00:02:41+5:30
हायड्रोलिक आॅटो खरेदीमधील ६०.९४ लाख रूपयांच्या अनियमिततेबाबत शहर कोतवाली पोलिसांनी महापालिकेला विचारणा केली आहे.
‘से’कडे लक्ष : ६०.९४ लाख रुपयांची अनियमितता, दुप्पट दराने २३ हॉपर आॅटोंची खरेदी, शहर कोतवालीचे पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हायड्रोलिक आॅटो खरेदीमधील ६०.९४ लाख रूपयांच्या अनियमिततेबाबत शहर कोतवाली पोलिसांनी महापालिकेला विचारणा केली आहे. खरेदीबाबतचा लेखापरीक्षण अहवाल पोलिसांनी मागविला असून महापालिकेच्या ‘से’वर या अनियमितता प्रकरणाच्या तपासाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. यासंदर्भात तत्कालिन वैद्यकीय आरोग्य अधिकारी (स्वच्छता) देवेंद्र गुल्हाने यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. तब्बल दुप्पट दराने २३ नग हायड्रोलिक आॅटो खरेदी करण्यात आले होते. त्यावर ६१ लाख खर्च करण्याऐवजी १.१२ कोटी खर्च करण्यात आलेत.
२३ नग ‘हायड्रोलिक हॉपर थ्री व्हिलर’ आॅटो पुरविण्याबाबत अहमदाबादच्या ‘मणियार अॅन्ड कंपनी’ ७ डिसेंबर २०१२ ला पर्चेस आॅर्डर देण्यात आली. त्यापूर्वी महापालिका उपायुक्त (सा) यांच्या स्वाक्षरीने २८ नोव्हेंबर २०१२ रोजी करारनामा करण्यात आला. ४,८९,८१५ रूपयांप्रमाणे २३ हॉपर आॅटो खरेदी करण्यासाठी मणियार कंपनीला १ कोटी १२ लाख ६७ हजार ५८५ रूपयांमध्ये पर्चेस आॅर्डर देण्यात आली. त्यापोटी कंपनीला महापालिकेतर्फे १.१२ कोटी रूपये देण्यात आले.
तत्पूर्वी सन २०१२-१३ मध्ये १३ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून १.१५ कोटींच्या तरतुदीनुसार थ्री व्हिलर हायड्रोलिक हॉपर आॅटो खरेदी करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. यानंतर स्पर्धात्मक दर उपलब्ध होण्यासाठी निविदा मागवून कारवाई करणे अपेक्षित होते. निविदाधारकाने दिलेले दर बाजार मूल्यापेक्षा अधिक नसल्याची खात्री करणे, वाटाघाटी करणे, याबाबी अपेक्षित होत्या. मात्र कंत्राटदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत केले.
२.२४ लाखात आॅटो उपलब्ध
अमरावती : हॉपर आॅटो खरेदीसाठी बोलावलेल्या निविदेत कमी दराची निविदा मे. मणियार अॅन्ड कंपनीची प्रतिहॉपर आॅटो ४,८९,८९५ रूपये अशी होती. मात्र, प्रत्यक्षात या दराची पडताळणी केली असता सन २०१२-१३ मध्ये अॅपे कंपनीच्या आॅटोची किंमत १,४९,८९६ रूपये तर हॉपर (ट्रॉली)ची किंमत ७७, हजार रूपये गृहित धरली तर थ्री व्हीलर हॉपर आॅटोची एकूण किंमत २,२४,८९६ रूपयांपर्यंत असावयास हवी होती. मात्र, प्रत्यक्षात मणियार कंपनीने २३ आॅटो प्रत्येकी ४,८९,८९५ रूपयांप्रमाणे महापालिकेला पुरविले.
गुल्हानेंवरील ठपका
कंत्राटदाराने पुरविलेल्या बनावट व खोट्या दस्तऐवजांची पडताळणी व तपासणी न करता कंत्राटदार, अधिकाऱ्यांशी संगनमत करून, षड्यंत्र रचून महापालिकेच्या पैशाचा अपव्यय केल्याचा ठपका तत्कालीन वैद्यकीय आरोग्य अधिकारी (स्वच्छता) देवेंद्र गुल्हाने यांच्यावर आहे. निविदा प्रक्रियेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट दस्तऐवज खरे असल्याचे भासवून बुद्धीपुरस्सर व हेतुपुरस्सर ६०.९४ लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप ‘मणियार अॅन्ड कंपनी’ व अन्य तिघांवर आहे.
कॅफो, आॅडिटलाही विचारणा
यासदोष निविदाप्रक्रियेवर तत्कालीन वेळी कार्यरत मुख्य लेखाधिकारी व मुख्य लेखापरीक्षकांसह तत्कालीन स्थायी समिती सभापतींनाही विचारणा होणार असल्याचे संकेत आहेत. एकंदरितच शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या ठाणेदार निलिमा आरज यांनी या फाईलवरची धूळ झटकून रखडलेल्या तपासाला आता वेग दिला आहे.
‘मणियार’ ला "रेड कार्पेट"
मणियार अॅन्ड कंपनीने हॉपर आॅटोचे दिलेले ४.९० लाख रुपयांचे दर ग्राह्य धरण्यात आले. त्या व्यतिरिक्त अशा प्रकारच्या आॅटोच्या दराबाबत स्थानिक वा इतरत्र कोणत्याही स्तरावर पत्रव्यवहार वा चौकशी करण्यात आली नाही. याबाबत ‘मणियार’ने यापूर्वी किती खरेदी धारकांना पुरवठा केला, त्याबाबतचे प्रमाणपत्र वा कार्यारंभ आदेश त्यांचेकडून मागविण्यात आले नाही. या सर्व बाबीवरून सन २०१३-१४ चे हायड्रोलिक आॅटो खरेदीमध्ये घोटाळा झाल्याच्या निदर्शनावरून येत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.