माहुली येथे गोऱ्ह्याच्या पाठीत खुपसली कुऱ्हाड
By admin | Published: April 10, 2016 12:03 AM2016-04-10T00:03:41+5:302016-04-10T00:03:41+5:30
येथे एका अडीच वर्षीय गोऱ्ह्याच्या पाठीत निर्दयतेने कुऱ्हाडीचा घाव घातल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
निर्दयता : पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार
माहुली : येथे एका अडीच वर्षीय गोऱ्ह्याच्या पाठीत निर्दयतेने कुऱ्हाडीचा घाव घातल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. नागरिकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यावर तातडीने उपचार करवून घेतले. त्यामुळे गोऱ्हा आता धोक्याबाहेर आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुधीर कोरडे नामक शेतकऱ्याच्या मालकीचा तो गोऱ्हा आहे. चराईसाठी गुराख्याने शुक्रवारी कळपात नेले होते. मात्र सायंकाळी तो गोऱ्हा घरी न आल्याने सुधीर कोरडे यांनी त्याचा गावभर शोध घेतला. मात्र तो कुठेही आढळून आला नव्हता.
शनिवारी सकाळी त्याच गोऱ्ह्याच्या पाठीत दांड्यासह कुऱ्हाड फसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी पशु रुग्णालयात नेले. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक कुऱ्हे यांनी मासात दांड्यासह फसलेली ती कुऱ्हा अथक परिश्रमानंतर बाहेर काढली. याची तक्रार सुधीर कोरडे यांनी पोलिसात दिली. त्याची चौकशी पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)