शासकीय बाबूंना भेटवस्तूसाठी मर्यादा
By admin | Published: April 25, 2015 12:28 AM2015-04-25T00:28:51+5:302015-04-25T00:28:51+5:30
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने शासकीय बाबूंसाठी नवीन नियमावली जारी केली आहे.
फतवा : आयएएस, आयपीएससाठी नियम
अमरावती : भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने शासकीय बाबूंसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची कोणतीही भेटवस्तू स्वीकारण्याआधी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये प्रवास, निवास यांचाही समावेश आहे. त्याशिवाय, नातेवाईक वा मित्राकडून २५ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची भेटवस्तू मिळाल्यास त्याबाबतही शासनाला माहिती देणे बंधनकारक आहे.
आयएएस, आयपीएस आदी सेवांसाठीच्या अखिल भारतीय सेवा नियमावलीमध्ये नुकतीच दुरुस्ती करण्यात आली. कार्मीक व प्रशिक्षण मंत्रालयाने हे नवीन अधिसूचित केले आहेत. यानुसार सरकारच्या परवानगीशिवाय पाच हजार रुपयांवरील कोणतीही भेटवस्तू स्वीकारता येणार नाही. याआधी ही रक्कम एक हजार रुपये होती. नवीन दुरुस्त्यानुसार ज्यांचा कार्यालयीन कामांशी संबंध नाही असे नातेवाईक वा मित्र यांच्याकडून विवाह, वाढदिवस, अंत्यसंस्कार किंवा अन्य धार्मिक कार्यक्रमासंबंधी धार्मिक व सामाजिक प्रथानुसार भेटवस्तू स्वीकारल्यास परवानगी देण्यात आली. मात्र मात्र अशा भेटवस्तुची किंमत २५ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्याबाबत सरकारला कळविणे बंधनकारक आहे. जवळच्या नातेवाईक किंवा मित्र यांच्या व्यतिरिक्त ज्यांच्याशी कार्यालयीन कामकाजाविषयी संबंध येत नाही, अशा व्यक्तीकडून विनामूल्य प्रवास, राहण्याची सुविधा किंवा अन्य कोणत्याही सेवा किया फायदा मिळाल्यास तो भेटवस्तु म्हणून गृहीत धरला जाईल, असेही या नियमातील यादीत स्पष्ट केले आहे. मात्र सहज घेलेले भोजन किंवा दिलेली लिफ्ट वा सामाजिक सोहळ्यातील यजमानपद हे भेटवस्तू ठरणार नाही. ज्याच्याशी कार्यालयीन कामकाजाबाबत संबंध येतो अशा व्यक्ती किंवा कंपन्या मंत्रालयाकडून महागडे किंवा वारंवार आदरातिथ्य घेणे अधिकाऱ्यांनी टाळावे असेही नियमात म्हटले आहे.