युवतीने दिला पित्याच्या मृतदेहाला भडाग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:15 PM2019-03-18T23:15:52+5:302019-03-18T23:16:06+5:30
चितेला अग्नी मुलीनेच द्यावा, अशी पित्याची इच्छा. त्याला स्मरून नांदगाव खंडेश्वर येथे युवतीने पित्याच्या मृतदेहाचा अंत्यविधी पार पाडला आणि चितेला अग्नी दिला. ही घटना नांदगाव खंडेश्वर येथे सोमवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : चितेला अग्नी मुलीनेच द्यावा, अशी पित्याची इच्छा. त्याला स्मरून नांदगाव खंडेश्वर येथे युवतीने पित्याच्या मृतदेहाचा अंत्यविधी पार पाडला आणि चितेला अग्नी दिला. ही घटना नांदगाव खंडेश्वर येथे सोमवारी घडली.
तुळशीदास सूर्यभानजी डोक यांचे रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांचे वय ६९ वर्षे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर अकोला येथे नगररचना विभागात आरेखक या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली आणि आप्तस्वकीयांमध्ये शेवटचे क्षण घालविण्यासाठी नांदगाव खंडेश्वर येथील राहत्या घरी वास्तव्याला आले. त्यांना दोन मुली आहेत. त्यामुळे मृत्यूपश्चात मुलींनीच अंत्यसंस्कार करून अग्नी द्यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. सोमवारी स्थानिक स्मशानभूमीत दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अंत्यसंस्काराचा विधी लहान मुलगी आरती हिने केला, तर मोठी मुलगी अनुराधा हिने अग्नी दिला. यावेळी स्मशानभूमीत तुळशीदास यांच्या पत्नी वैजंता डोक यादेखील उपस्थित राहिल्या. याप्रसंगी माळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक परिवर्तनाचे उपस्थितांनी स्वागत केले.