मुलगा झाल्याचे सांगून हाती दिली मुलगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:49 PM2018-05-21T23:49:23+5:302018-05-21T23:49:39+5:30
शस्त्रक्रिया विभागातून मावशी बाहेर आली आणि तिने बाहेर उभे असणाऱ्या महिला रुग्णाच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याचे सांगितले. नातेवाईकांना उत्साह गगनात मावेनासा झाला. मात्र, तासभरात हाती मुलगी दिल्यानंतर संताप अनावर होऊन त्यांनी रुग्णालयात गोंधळ उडाला. मावशीने अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी केलेल्या या कृत्यामुळे गैरसमज निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शस्त्रक्रिया विभागातून मावशी बाहेर आली आणि तिने बाहेर उभे असणाऱ्या महिला रुग्णाच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याचे सांगितले. नातेवाईकांना उत्साह गगनात मावेनासा झाला. मात्र, तासभरात हाती मुलगी दिल्यानंतर संताप अनावर होऊन त्यांनी रुग्णालयात गोंधळ उडाला. मावशीने अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी केलेल्या या कृत्यामुळे गैरसमज निर्माण झाला होता.
जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका व मदतनीस (मावशी) रुग्णांच्या नातेवाइकांना पैसे मागत असल्याचे आरोप अनेकदा नातेवाइकांकडून झाले आहेत. मुलगा किंवा मुलगी जन्माला आले की, रुग्णाचे नातेवाईक बक्षीसस्वरूपात काही ना काही देतात, असा समजच रूढ झाला आहे. मात्र, हा प्रकार अंगलट येऊ शकते, याची प्रचिती सोमवारी डफरीन रुग्णालयात आली. शस्त्रक्रिया विभागात कंत्राटी तत्वावर कार्यरत एका मावशीने विभागातून बाहेर येऊन रुग्णांच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याची माहिती दिली. मात्र, प्रत्यक्षात त्यांना मुलगी झाल्याचे लक्षात आले. मात्र, तोपर्यंत सर्व डफरीन यंत्रणा कामी लागली होती. वरिष्ठ अधिकाºयांसह परिचारिकांना या प्रकाराचा जाब विचारण्यात आला. त्यावेळी मावशीमुळे गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले.
बाळ जन्माला येताच त्यांना टॅग लावला जातो. त्यावर संबंधित महिलेचे नाव तात्काळ टाकले जाते. बाळ अदलाबदलीचा प्रश्नच उद्भवत नाही. मावशीने बाहेरील रुग्णांच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याचे सांगितल्याने हा गैरसमज झाला. तिला समज देण्यात आली आहे.
- अर्चना जामठे, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय.
यापूर्वी झाली डीएनए टेस्ट
काही वर्षांपूर्वी डफरीन रुग्णालयात असाच प्रकार समोर आला होता. एकाच नावाच्या दोन महिलांची प्रसूती झाली. त्यानंतर मुलगा व मुलगी कोणाची, असा प्रश्न उद्भवला होता. त्यावेळी दोन्ही बाळांची डीएनए टेस्ट करून त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले होते.
नेमके काय घडले?
नांदुरा खुर्द येथील २१ वर्षीय महिलेस सोमवारी सकाळी ६ वाजता व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका २४ वर्षीय महिलेस सकाळी १० वाजता प्रसूतीसाठी दाखल केले. त्यांना सिझरसाठी एकाच वेळी नेण्यात आले. ११.१५ मिनिटांनी नांदुरा खुर्द येथील महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला, तर पाचच मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर येथील महिलेने मुलाला जन्म दिला. यादरम्यान शस्त्रक्रिया विभागातील एक मावशी बाहेर गेली आणि नांदुरा खुर्द येथील महिलेच्या नातेवाइकाला मुलगा झाल्याचे सांगितले. नेमक्या त्याच कुटुंबात मुलगी झाली. तासभरानंतर दोन्ही महिलांच्या हाती बाळ आल्यानंतर नांदुरा खुर्द येथील कुटुंबीयांनी आक्षेप घेतला. मुलगी हाती दिल्याने बाळांच्या अदलाबदलीचा संशय नातेवाइकांना आला होता. डीएनए टेस्ट करू, असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगून हा संशय दूर झाला.