चक्क मुलीनेच आईला मागितली ५० हजारांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 03:36 PM2021-12-12T15:36:59+5:302021-12-13T12:09:56+5:30

४५ वर्षीय महिलेच्या मोबाईलवर परिचित व्यक्तीसोबतच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह ५० हजारांच्या खंडणीचा मेसेज पाठविल्या गेला. आई आणि त्या परिचित व्यक्तीमधील बोलणे थांबविण्याकरिता मुलीचा हा प्रयत्न असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

a girl herself demanded a ransom of 50 thousand from her mother | चक्क मुलीनेच आईला मागितली ५० हजारांची खंडणी

चक्क मुलीनेच आईला मागितली ५० हजारांची खंडणी

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलेची परिचिताशी संभाषण टाळण्यासाठी केली मागणीमुलीचा मोबाईल ताब्यात, परतवाडा पोलिसांचा तपास

अनिल कडू

अमरावती : चक्क मुलीनेच आईला ५० हजारांची खंडणी मागितल्याचा प्रकार पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आला. यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. पण, परतवाड्यातील घटनाक्रमाचा पोलिसांनी तपास केला असता, हे सत्य उघड झाले आहे.

परतवाड्यातील ४५ वर्षीय त्या महिलेच्या मोबाईलवर परिचित व्यक्तीसोबतच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह ५० हजारांच्या खंडणीचा मेसेज पाठविल्या गेला. मागितलेली खंडणी निर्धारित वेळेत जमा करण्याकरिता एक बँक अकाउंटही देण्यात आला होता. मागितलेली खंडणी दिलेल्या बँक अकाऊंटवर जमा न केल्यास फोनवरील संभाषणाची रेकॉर्डिंग ज्याच्याजवळ पोहचवून चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे आहेत, त्याच्याजवळ पोहोचवू. सर्वत्र बदनामी करू, अशी धमकीही त्या मेसेजमधून महिलेला देण्यात आली होती.

रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर ते आपलेच संभाषण असल्याची खात्री महिलेला पटली. नाहक बदनामी नको म्हणून महिलेने परतवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. ज्या संभाषणाबाबत धमकी मिळाली, तसे संभाषण जुनाच परिचय असलेल्या व्यक्तीसोबत अधूनमधून होत होते, असे त्या महिलेने पोलिसांपुढे स्पष्ट केले. स्वत:च्या २१ वर्षीय भाच्यावर महिलेने तक्रारीत संशय व्यक्त केला. तक्रारीच्या अनुषंगाने त्या संशयित युवकाविरुद्ध पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदविला. हा युवक रशियात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

दरम्यान, पोलिसांनी त्या क्रमांकासह बँक खात्याविषयी खातरजमा केली. त्या बँक खात्याचा मालक कोण, याविषयी पोलिसांनी माहिती मिळविली. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या महिलेच्या मुलीकडेही त्या अनुषंगाने विचारपूस करण्यात आली. आई आणि त्या परिचित व्यक्तीमधील बोलणे थांबविण्याकरिता मुलीचा हा प्रयत्न असल्याची माहिती यात पुढे आली. तसे मुलीने पोलिसांना सांगितले. परतवाडा पोलिसांनी मुलीचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. पुढील चौकशी पोलीस करीत आहेत.

तक्रारदार महिलेच्या मुलीचा या प्रकरणात सहभाग आहे. मुलीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.

- संतोष ताले, ठाणेदार, परतवाडा

Web Title: a girl herself demanded a ransom of 50 thousand from her mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.