कीर्रऽऽ रात्री उतरवून दिले विद्यार्थिनीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:17 AM2019-02-24T01:17:00+5:302019-02-24T01:19:06+5:30
‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ हे ब्रीद मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाने एकट्या विद्यार्थिनीला रात्रीच्या काळोखात अर्ध्यातच उतरून दिल्याचा प्रकार वरखेड ते निंभोरा मार्गावर गुरुवारी उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : ‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ हे ब्रीद मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाने एकट्या विद्यार्थिनीला रात्रीच्या काळोखात अर्ध्यातच उतरून दिल्याचा प्रकार वरखेड ते निंभोरा मार्गावर गुरुवारी उघडकीस आला.
तिवसा आगारातील बस क्रमांक एम एच ४०-८७५३ शेंदूरजना बाजार, निंभोरा मार्गे वरखेड अशी फेरी करून व तिवस्याला परत जाते. २१ फेब्रुवारी रोजी निघालेली बसफेरी रात्री साडेसातला उंबरखेड फाट्यावरच थांबली व तिथे तारखेड येथील एकाच मुलीला उतरविले. बस वरखेडला जाणार नाही; तू कशानेही घर गाठ, असे बसचालकाने तिला सांगितले. वारंवार चालकाला विनंती करूनसुद्धा चालक व वाहक ठाम होते. सदर विद्यार्थिनी तिवसा येथे एमएससीआयटी व टायपिंगकरिता तिवसा येथे दररोज जाते. जेथे तिला उतरविले, त्या उंबरखेड फाट्यावरून तिचे गाव तीन किमी अंतरावर आहे. हे अंतर काळोखात पायी गाव गाठले. थोडे पैसे कमी घेऊन एसटी वाहक तिकीट न देताच स्वत:चे खिसे भारतात, अशी चर्चा प्रवाशांमध्ये आहे. एकट्या मुलीला रात्रीच्या वेळी अर्ध्यातच उतरून देण्याचा प्रकार बेपर्वाईची हद्द ठरली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या.
माझ्या गावात दररोज सायंकाळी ५ वाजता बस येते. परंतु, गुरुवारी रात्री ७.३० वाजता रात्रीचा काळोख असतानाही चालकाने मला उंबरखेड फाट्यावर उतरविले. तू कशानेही जा, तुझे तू पाहून घे, असे बोलून चालकाने पुढे बस दामटली. मी एकटीने अंधारातच घर गाठले.
- पूजा सुभाष रंगारी, विद्यार्थिनी
सदर विद्यार्थिनीची लेखी तक्रार मी वरिष्ठ अधिकाºयांकडे पाठवली आहे. यामध्ये चालक आणि वाहक यांची चौकशी होईल आणि दोषी आढल्यास कारवाई केली जाईल.
- प्रतीक मोहोड,
आगार व्यावस्थापक, तिवसा