धारणीच्या तरूणाकडून अमरावतीकर तरूणीचे लैंगिक शोषण, मारहाण
By प्रदीप भाकरे | Published: June 2, 2023 04:25 PM2023-06-02T16:25:28+5:302023-06-02T16:26:21+5:30
तीन वर्षांच्या प्रेमसंबंधांचा अकाली शेवट
अमरावती : धारणी येथील एका २५ वर्षीय तरुणाने येथील एका १९ वर्षीय तरूणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. २४ नोव्हेंबर २०२२ रोजीनंतर वारंवार त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. याप्रकरणी पिडिताच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी राणा राजा कुरेशी (२५, रा. धारणी) याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, यातील फिर्यादी १९ वर्षीय तरूणी व आरोपी राणा हे दोघे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे आरोपीचे फिर्यादीच्या अमरावती येथील घरी येणे जाणे होते. त्यादरम्यान दोघांमधील ओळख अधिक घट्ट होऊन त्यांच्यातील संवाद वाढला. त्याने तिला प्रपोझ केले. त्याला तिने देखील होकार दिला. तब्बल तीन वर्ष त्यांच्यात प्रेमसंबंध होते.
दरम्यान, २४ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी दिडच्या सुमारास ती राजकमल चौक येथे शॉपिंगला गेली असताना आरोपी राणा तिला तेथे भेटला. मला तुझ्याशी बोलायचे आहे. सोबत मित्राच्या घरी चल, अशी बतावणी त्याने केली. त्यामुळे ती त्याच्या दुचाकीवर बसली. त्याने तिला साईनगर येथील एका महिलेच्या घरातील रूममध्ये नेले. अचानक तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्यासाठी जबरदस्ती केली. नकार दिला असता त्याने तिला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध केले. त्यावेळी ती खुप रडली.
आईने विचारला जाब, दिला धीर
अचानक घडलेल्या त्या घटनेमुळे ती प्रचंड घाबरली. तिच्या त्या घाबरलेल्या अवस्थेचा गैरफायदा घेत त्यानी तिला अनेकदा धमकावले. तथा वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. तिला मारहाण देखील केली. दरम्यान, तो प्रकार तिच्या आईला समजताच तिला जाब विचारण्यात आला. तिने आईजवळ संपुर्ण आपबिती कथन केली. त्यानंतर तिच्या आईने तिला धीर दिला. त्यामुळे तिने ३१ मे रोजी रात्री राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी १ जून रोजी रात्री एकच्या सुमारास गुन्हा नोंदविला.