तू माझ्याशी बोलत का नाही? म्हणत आवळला गळा; २० दिवसांनंतर मृत्यूचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 10:32 AM2022-09-13T10:32:50+5:302022-09-13T11:01:04+5:30

ती १८ ऑगस्टपासून बेपत्ता होती. तर १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी तिचा मृतदेह एका शेतातील विहिरीत आढळून आला होता.

Girl strangled to death in amravati, truth revealed after 20 days of death | तू माझ्याशी बोलत का नाही? म्हणत आवळला गळा; २० दिवसांनंतर मृत्यूचा उलगडा

तू माझ्याशी बोलत का नाही? म्हणत आवळला गळा; २० दिवसांनंतर मृत्यूचा उलगडा

googlenewsNext

चिखलदरा (अमरावती) : एका १९ वर्षीय युवतीला शेतात बोलावून तू माझ्याशी का बोलत नाहीस, अशी विचारणा करत तिच्याशी वाद घालण्यात आला. तर वादादरम्यान तिचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तिचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी सोमवारी तिघांविरुद्ध खून, पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला असून, तिघांनाही अटक करण्यात आली आहे. घटनेच्या २० दिवसांनंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

अमोल सुखदेव उईके (२९ वर्षे, रा. कोटमी), जाकीर अहमद उर्फ जाकू अहमद निसार (२४, रा. मुगलाईपुरा, परतवाडा) व मुकेश रामसिंग बेठेकर (१९, रा. कोटमी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द खून, खुनाचा पुरावा नष्ट करणे व ॲट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबिका गोंडू मरस्कोल्हे (१९, रा. कोटमी) असे मृत मुलीचे नाव आहे.

अंबिका ही १८ ऑगस्टपासून बेपत्ता होती. तर १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी तिचा मृतदेह तिचे मोठे वडील धोंडू रामुस मरसकोल्हे यांना त्यांच्या शेतातील विहिरीत आढळला होता. त्याबाबत त्यांनी चिखलदरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाढवे यांनी तपास चालविला होता. तपासादरम्यान आरोपी निष्पन्न झाले. पुढील तपास धारणीचे एसडीपीओ गोहर हसन करीत आहेत.

वीस दिवसांनंतर लागला छडा

युवतीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने त्यावेळी तर्कवितर्क व्यक्त होत होते. परंतु ग्रामीण पोलिसांनी घटनेचा सखोल तपास चालविला. साक्षीदार व इतरांना विचारपूस केली असता त्यात तीनही आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. तू माझ्याशी का बोलत नाही, या कारणाने त्यांच्यात वाद झाला. वादादरम्यान तिचा गळा आवळला गेला. तथा पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याचे तपासात उघड झाले.

तरुणीची आरोपींपैकी नेमकी कुणाशी ओळख होती, प्रेमसंबंध होते का, तिच्यावर अत्याचार करण्यात आला का, तिचा गळा नेमका कोणी आवळला, या बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.

युवतीची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यावरून तिघांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

- राहुल वाढवे, ठाणेदार, चिखलदरा

Web Title: Girl strangled to death in amravati, truth revealed after 20 days of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.