नीटचा रिझल्ट असमाधानकारक; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले म्हणून तिने...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 04:41 PM2021-11-03T16:41:26+5:302021-11-03T16:45:06+5:30
नीटच्या परीक्षेत समाधानकारक स्कोअर न आल्याने खचलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अमरावती : नीटचा रिझल्ट अपेक्षेनुरूप न आल्याने एका २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. धनत्रयोदशीच्या दिवशी ‘त्या’ घरातील लक्ष्मीने अकाली एक्झिट घेतली. त्यामुळे दिवाळीच्या पर्वावर ‘ते’ घर सुन्न झाले आहे. २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
राजापेठ ह्दीतील एका कॉलनीतील ती तरुणी मागील दोन वर्षांपासून नीटची परीक्षा देत होती. दरवेळी यश तिला हुलकावणी देत होते. यंदाही सप्टेंबरमध्ये तिने परीक्षा दिली. रात्रीचा दिवस करीत पूर्वतयारी केली. ७५० गुणांची परीक्षाही चांगल्या प्रकारे पार पडली. यादरम्यान १ नोव्हेंबर रोजी निकाल आला. समाधानकारक स्कोअर न आल्याने ती नखशिखांत हादरली. आता आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, सर्व काही संपले, असा आतातायी विचार करून तिने स्वत:ला संपविले.
२ नोव्हेंबर रोजी दुपारी ‘लक्ष्मी’ (नाव बदललेले) ला तिच्या वडिलांनी नीटच्या निकालाविषयी विचारणा केली. त्यावर यायचा आहे, असे सांगून ती आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. खूप वेळ झाल्यानंतरही ती बाहेर न आल्याने लहान बहिणीने तिला हाक दिली. मात्र, आतून प्रतिसाद आला नाही. बाथरूमचे दार थोडे उघडे असल्याने डोकावण्याचा प्रयत्न केला, तर ती शॉवरला गळफास घेतलेल्या अवस्थेत ती दिसली. मोठ्या बहिणीला तसे बघितल्यानंतर धाकटीने आरडाओरड केली. आईवडीलही धावले. मात्र, तोपर्यंत सारे काही संपले होते.
उपचारादरम्यान मृत्यू
आईवडिलांनी तिला गळफास घेतलेल्या स्थितीतून खाली काढून जवळच्या एका खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, तिचा उपाचारादरम्यान मृत्य झाला. तसा अहवाल तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. याबाबत राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अगदी धनत्रयोदशीच्या दिवशी मुलीच्या रूपाने ‘लक्ष्मी’नेच अकाली एक्झिट घेतल्याची अनावर भावना त्या कुटुंबात होती. राजापेठचे एएसआय सतीश रायचंद यांनी पंचनामा केला व तिचे पार्थिव उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले.