शाळेच्या वर्गखोलीचा तुकडा कोसळला, विद्यार्थिनी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 14:49 IST2022-02-22T13:35:14+5:302022-02-22T14:49:31+5:30
जिल्हा परिषद शाळेतील या वर्गात एकूण २२ विद्यार्थिनी पटावर आहेत. गावात लग्न असल्याने सोमवारी १३ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. पैकी तीन विद्यार्थिनी वर्गखोलीत जाताच त्यांच्या अंगावर स्लॅबचा मोठा भाग कोसळला.

शाळेच्या वर्गखोलीचा तुकडा कोसळला, विद्यार्थिनी जखमी
परतवाडा (अमरावती) : चिखलदरा तालुक्यातील वस्तापूर येथे जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोलीच्या स्लॅबचा तुकडा कोसळल्याने एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली, तर दोघी बचावल्या. सोमवारी सकाळी ११:३० वाजता हा प्रकार घडला
भारती हिरामन कासदेकर असे जखमी झालेल्या चौथीतील विद्यार्थिनीचे नाव आहे. जिल्हा परिषद शाळेतील या वर्गात एकूण २२ विद्यार्थिनी पटावर आहेत. गावात लग्न असल्याने सोमवारी १३ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. पैकी तीन विद्यार्थिनी वर्गखोलीत जाताच त्यांच्या अंगावर स्लॅबचा मोठा भाग कोसळला. वर्गशिक्षिकेने समयसूचकता दोन विद्यार्थिनींना बाहेर काढले. त्यामुळे त्या बचावल्या. जखमी विद्यार्थिनीच्या औषधोपचाराची सुविधा तातडीने करण्यात आली.
वर्षभरापूर्वी दुरुस्ती
जिल्हा परिषदेच्या या वर्गखोलीची दुरुस्ती एक वर्षापूर्वी उपसरपंच गजानन येवले यांनी केल्याची माहिती वृत्त लिहिस्तोवर पुढे आली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती गौरखेडा बाजार येथील केंद्रप्रमुख सविता भासकरे यांनी वरिष्ठांना कळविली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मेळघाटातील शाळा दुरुस्ती चर्चेचा विषय ठरली.
पहिल्याच दिवशी झाला असता मोठा अनर्थ
सोमवारपासून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. एकूण २२ विद्यार्थ्यांपैकी बरेचसे विद्यार्थी पहिल्याच दिवशी गैरहजर असल्याने मोठा अनर्थ टळला.
वस्तापूर येथील शाळेत इयत्ता चौथीमधील वर्गखोलीचे स्लॅबचा काही भाग कोसळून एक विद्यार्थिनी जखमी झाली. समयसूचकता पाहता दोन विद्यार्थिनींना शिक्षकांनी ओढल्याने त्या बचावल्या.
- सविता भासकरे, केंद्रप्रमुख, गौरखेडा बाजार