महिलेने मुलीसह घेतली रेल्वेसमोर उडी, चिमुरडीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:06 PM2017-08-22T23:06:27+5:302017-08-22T23:06:50+5:30
दोन दिवसांपूर्वी पतीने आत्महत्या करून इहलोकाचा निरोप घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दोन दिवसांपूर्वी पतीने आत्महत्या करून इहलोकाचा निरोप घेतला. ती ढासळली. तिचे मनोबल खचले. जगण्याचा उद्देशच समाप्त झाला. नैराश्याच्या खोल गर्तेत गटांगळ्या खात असतानाच कोणताच मार्ग न गवसल्याने तिने मंगळवारी पहाटे ३ वाजता अडीच वर्षांच्या चिमुरडीसह रेल्वेसमोर उडी घेतली. दुर्देवाने चिमुकली दगावली आणि डावा हात गमावून ती मात्र जीवन-मृत्युचा संघर्ष करते आहे.
आराध्या राहुल मिश्रा (अडीच वर्षे) असे मृत चिमुरडीचे तर पिंकी उर्फ प्रियंका राहुल मिश्रा (२४) असे जखमी महिलेचे नाव आहे.
अंगावर शहारे आणणारी ही घटना मंगळवारी पहाटे तीन वाजता मॉडेल रेल्वे स्थानकानजीक चिचफैल परिसरातील रेल्वे ट्रॅकवर घडली. अवघ्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे रविवार २० आॅगस्ट रोजी पिंकीचे पती राहुल ब्रह्मदेव मिश्रा (३०, मूळ रहिवासी उत्तरप्रदेश, ह.मु.कल्याणनगर ) याने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली होती, हे विशेष. राहुल मिश्रा हा एका पॅथॉलॉजीत रक्त तपासणीचे काम करीत होता. कल्याणनगरात भाड्याच्या खोलीत राहून याच नोकरीच्या भरवशावर तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.
मला जगायचेच नाही
मात्र, काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असल्याचे नातलगांनी सांगितले. याच तणावातून त्याने आत्महत्या केली. पतीनिधनाच्या आकस्मिक धक्क्याने त्याची पत्नी पिंकीचेही मानसिक संतुलन ढासळले होते. त्यामुळे कुुटुंबीयांनी तिला चिचफैल येथील राहुलच्या काकांकडे आणून सोडले होते. मंगळवारी पहाटे कुणालाही न सांगता ती मुलीला घेऊन रेल्वे स्थानकाकडे निघाली. तिने थेट अमरावती-बडनेरा रेल्वेसमोर मुलीसह उडी घेतली. या अपघातानंतर रेल्वे थांबली. रेल्वे कर्मचाºयांनी गाडीखालून तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, जखमी अवस्थेतही ती ‘मला जगायचे नाही, मरू द्या..’ असा टाहो फोडत होती. या घटनेत चिमुरड्या आराध्याचा मात्र जागीच मृत्यू झाला तर पिंकीचा एक हात शरीरापासून वेगळा झाला. आराध्याचा मृतदेह विच्छेदनासाठी इर्विनला आणण्यात आला.