दिव्यांग तरुणीवर नराधमाचा अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर समोर आली घटना
By प्रदीप भाकरे | Published: November 16, 2022 05:40 PM2022-11-16T17:40:46+5:302022-11-16T17:46:51+5:30
ती तरुणी डावा हात व डाव्या पायाने दिव्यांग असून, मानसिकदृष्ट्या कमकुवत
अमरावती : वरूड तालुक्यातील एका २६ वर्षीय दिव्यांग तरूणीवर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आला. त्यातून तिला गर्भधारणा झाल्याची धक्कादायक बाब १५ नोव्हेंबर रोजी उघड झाली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आशा स्वयंसेविकेच्या तक्रारीवरून आरोपी कालू ऊर्फ जयसिंग शिलूरकर (३०, बिसेघाट, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
तक्रारकर्ती महिला ही आशा सेविका असून, ती गावातील गरोदर माता शोधून, त्यांना प्रसूती व कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी ग्रामीण हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचे काम करते. १५ नोव्हेंबर रोजी वरूड तालुक्यातील एका गावात ती अशा महिला, तरुणींची तपासणी करत असताना एका पुरुष कुटुंबप्रमुखाने त्याच्या दिव्यांग साळीबाबत माहिती दिली. ती तरुणी डावा हात व डाव्या पायाने दिव्यांग असून, मानसिकदृष्ट्या देखील ती कमकुवत असल्याचे सांगण्यात आले.
ती गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आले. अधिक चौकशी केली असता, आरोपी कालूने तिच्या स्थितीचा गैरफायदा घेत, तिच्यासोबत वारंवार अत्याचार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाल्याचे लक्षात आले. त्याबाबत वाच्यता केल्यास तिला जिवाने मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत त्या आशा सेविकेने मंगळवारी सायंकाळी वरूड पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदविली.