मैत्रिणीच्या आईनेच विद्यार्थीनीस बेकायदा डांबले, पोलिसांनी केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 11:05 PM2019-02-02T23:05:13+5:302019-02-02T23:05:16+5:30
अंबाडी येथील एक १७ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी रोजी दुपारी धारणी येथिल एका महिलेच्या घरी लाचा देण्याकरीता गेली. त्यावर आरोपी महिलेने लाचा घेण्यास नकार देऊन पैशाची मागणी केली.
धारणी (अमरावती) : वापरण्यास घेतलेल्या लाच्याचे पैसे देण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थीनीस एका ३५ वर्षीय महिलेने दिवसभर डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना धारणी येथे घडली. १ फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. तर रात्री १०.३० च्या सुमारास याप्रकरणी एका महिलेविरुध्द कलम ३४२ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. तिला अटक करण्यात आली.
अंबाडी येथील एक १७ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी रोजी दुपारी धारणी येथिल एका महिलेच्या घरी लाचा देण्याकरीता गेली. त्यावर आरोपी महिलेने लाचा घेण्यास नकार देऊन पैशाची मागणी केली. मात्र, सदर मुलीजवळ लाचाची रक्कम चुकविण्याएवढे पैसे नव्हते. ती पैसे देऊ शकली नाही. त्यामुळे आरोपी महिलेने सदर मुलीस तिच्या घरात बेकायदेशिर डांबून ठेवले. अखेर, पोलिसांनी तिची सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत १७ वर्षीय मुलगी धारणीपासून ८ किमी अंतरावर असलेल्या अंबाडी येथिल रहिवासी आहे. ती धारणी येथिल एका शाळेत शिकते. या प्रकरणातील आरोपी महिलेची मुलगी तिची वर्गमैत्रिण आहे. दरम्यान संबंधित शाळेत एक कार्यक्रम असल्याने या १७ वर्षीय विद्यार्थीनीने आरोपी महिलेच्या मुलीचा लाचा घालण्याकरीता घेतला. कार्यक्रम झाल्यानंतर तो परत देण्याकरीता ती १ फ्रेबुवारी रोजी दुपारी त्या मैत्रिणीच्या धारणी स्थित घरी गेली. मात्र लाचा खराब झाल्याचे सांगत त्या मैत्रिणीच्या आईने तो परत घेण्यास नकार दिला. व लाचाची किमत मागितली.
अशी झाली सुटका
दुपारी १ च्या सुमारास आरोपी महिलेने विद्यार्थीनीस बेकायदा डांबून ठेवले. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेने ती भेदरली. मात्र नंतर प्रसंगावधान राखत तिने तिने स्वत:कडील मोाबाईलवरुन खामगाव येथिल आत्याशी संपर्क साधला. त्यांना आपबिती सांगितली. त्यावर पिडीतेच्या आत्याने खामगाव पोलिसांशी संपर्क साधून धारणी पोलिसांचा संपर्कक्रमांक मिळविला. एका मुलीस डांबून ठेवल्याची माहिती मिळताच धारणी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरिक्षक अरुण राऊत व त्यांच्या पथकाने सायंकाळी ६ ते ८ च्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन राबविले. आरोपीच्या घराचा शोध घेऊन मुलीची सुटका केली. तर आरोपी महिलेस अटक केली.
दरम्यान, खामगाव पोलिसांनी याबाबत संपर्क साधला. लगेचच शोधमोहिम राबविण्यात आली. मुलीची सुटका करुन आरोपी महिलेस अटक करण्यात आली.
अरुण राऊत, सहायक पोलिस निरिक्षक, धारणी