राष्ट्रसंतांना ‘भारतरत्न’ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:23 AM2019-08-01T01:23:32+5:302019-08-01T01:24:21+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, ही मागणी आता भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजपने याला समर्थन देऊन मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा गुरुदेव भक्तांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, ही मागणी आता भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजपने याला समर्थन देऊन मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा गुरुदेव भक्तांनी केली आहे
‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. अनेक थोर व्यक्ती अजूनही या सन्मानापासून वंचित आहेत. हा सन्मान अजुनही एकाही संताला देण्यात आला नाही. काही संत स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेले. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सन १९०९ पासून सन १९६८ पर्यंत देहरूपाने होते. कार्यरूपाने तर आजही आहेत. या थोर महामानवाला ‘भारतरत्न’ मिळण्याबाबत अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे तुकारामदादा गीताचार्य यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचच्या आवाहनामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये याबाबत ग्रामसभेचे ठराव झाले आहेत. लक्ष्मणदास काळे महाराज, सत्यपाल महाराज, भाऊसाहेब थुटे, राजेंद्र मोहितकर अशा अनेक प्रबोधनकारांनी समर्थन करून जनतेला निवेदने पाठविण्याचे आवाहन केले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार तसेच विदभार्तील अनेक आमदार-खासदारांनी समर्थन करून या मागणीवर पत्रव्यवहार केला. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. लोकसभेत यापूर्वी माजी खासदार महादेवराव शिवणकर, हंसराज अहीर तसेच खासदार अशोक नेते यांनी प्रश्न उपस्थित केला. विधानसभेत तत्कालीन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अशासकीय ठराव मांडला होता. महाराष्ट्र सरकारने शिफारसपत्र पाठविले. केंद्र सरकारच्या गृहविभागाने शिफारस केली. आता १ आॅगस्टला महाजनादेश यात्रेची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह करणार आहेत. यानिमित्त केंद्रातील मंत्री व राज्यातील मंत्रिमंडळात उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात भाजपा सरकारने तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करावा, अशी अपेक्षा गुरुदेवभक्तांची आहे
तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ मिळाले पाहिजे, यासाठी मी शासनस्तरावर पाठपुरावा केला. ही मागणी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांकसुद्धा आहे. सरकारने मागणीची दखल घ्यावी.
- यशोमती ठाकूर
आमदार, तिवसा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे केंद्र सरकार याबाबत निर्णय घेणार आहे, याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
- निवेदिता चौधरी (दिघडे), प्रदेश सचिव, भाजप