जिल्ह्यात उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार द्या
By admin | Published: April 15, 2015 12:17 AM2015-04-15T00:17:22+5:302015-04-15T00:17:22+5:30
जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु, मध्यम आणि विशाल उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यात यावा,..
मागणी : यशोमती ठाकूर यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
अमरावती : जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु, मध्यम आणि विशाल उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनासाठी अमरावतीत आले असता आ. यशोमती ठाकूर यांनी त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
जिल्ह्यामधील सुक्ष्म, लघु, मध्यम आणि विशाल उद्योगांनी जिल्हा उद्योग केंद्रांकडून विशेष प्रोत्साहने आणि सवलतीचा लाभ घेतला आहे. अशा उद्योगांमध्ये पर्यवेक्षीय श्रेणीत ५० टक्के आणि इतर श्रेणीत ८० टक्के स्थानिक उमेदवारांना नोकरीमध्ये सामावून घेणे आवश्यक आहे. मात्र तसे चित्र येथे पाहायला मिळत नाही. स्थानिक उमेदवारांना नोकरीत डावलेले जाते. आपल्या मतदारसंघातील नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये रतन पॉवर इंडिया, टेक्सस्टाईल उद्योग सुरू आहे. तसेच अनेक उद्योग येथे प्रस्तावित आहे. एमआयडीसीसाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आली असल्याने या उद्योगांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील पदवीधर, कुशल व अकुशल युवकांना तसेच अन्य स्थानिकांना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार नोकरीमध्ये शासन निर्णयानुसार सामावून घेण्यात यावे अशी आग्रही मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. रतन पॉवर इंडिया प्रकल्पाने स्थानिक उद्योगांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा केल्यास येथील औद्योगिक विकास साधला जावू शकतो. त्यादृष्टीने कारवाई करण्याची मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली. एमआयडीसीमध्ये रोजगार देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे.
खरिपापाठोपाठ रबीही बुडाला
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही हातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर करुन दिलासा द्यावा, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी विधान भवनात औचित्याचा मुद्दा मांडताना केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेला. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने रब्बी हंगामात पेरणी केली. परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आली. नापिकीमुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा फेडावा या विवंचनेत शेतकरी आत्महत्या करीत आहे.